जळगाव शहर
जळगाव शहराला वाघूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहराची लोकसंख्या सुमारे चार ते साडेचार लाख इतकी असून एवढ्या लोकसंख्येसाठी दररोज 80 एमएलडी पाणीसाठ्याची गरज भासते. आजमितीस वाघूरमध्ये केवळ 16 टक्के जलसाठा शिल्लक असल्याने शहराला 3 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हा जलसाठा जून अखेरपर्यंत पुरणार असल्याचा महापालिका पाणीपुरवठा विभागाचा अंदाज आहे. मात्र, दुर्दैवाने पाऊस लांबणीवर पडला तर शहरात पाणीबाणी उद्भवू शकते. वाघूर धरणाच्या डाऊन स्कीम व्यतिरिक्त शहराला पाणीपुरवठा होऊ शकेल, अशी पर्यायी व्यवस्था नाही. वाघूरमधील घटता जलसाठा लक्षात घेता जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात अजून पाणीकपात होऊन पाणीपुरवठा 4 ते 5 दिवसाआड होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे वाघूर धरण पुरेसे भरले नाही. त्यामुळे जळगावकरांसमोर पाणीटंचाईचे संकट आहे. वाघूर धरणाची जलपातळी 226.00 मीटर इतकी आहे. तर उच्चतम जलपातळी 234.10 मीटर आहे. महापालिकेची जलवाहिनी 220.20 मीटर जलपातळीवरून पाणी उचलते. सध्याचा जलसाठा जून महिन्याच्या अखेरपर्यंत पुरणार असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला तरी, उन्हाळ्याची तीव्रता पाहता जलसाठ्यात मोठी घट होत आहे. अशा परिस्थितीत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने महापालिकेकडून डाऊनस्किम वापरात आणली जाणार आहे. डाऊनस्कीमची जलपातळी 215 मीटर इतकी आहे. दरम्यान, महापालिकेकडून आतापर्यंत एकाच वर्षी डाऊनस्किमचा वापर करण्यात आला आहे. त्यानंतर एकदाही डाऊनस्किमचा वापर झाला नसल्याने महापालिकेने उन्हाळ्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात डाऊनस्किमची तपासणी केली होती. धरणातील जलसाठा झपाट्याने घटत असल्याने आता जळगाव शहराची मदार डाऊनस्कीमवर असणार आहे.
भुसावळ
तापी नदीपात्रातील ब्रिटिशकालीन बंधारा आणि हतनूर धरणातून भुसावळ शहराला पाणीपुरवठा होतो. हतनूर धरणात दरवर्षी सुमारे 22 टीएमएलसी पाणीसाठा भुसावळसाठी आरक्षित असतो. मात्र, यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने तापी नदीपात्रातील ब्रिटिशकालीन बंधारा कोरडाठाक पडला आहे. तर हतनूर धरणातील जिवंत साठा संपला असून मृतसाठा 25 टक्के शिल्लक असल्याचा अंदाज आहे. हतनूरमध्ये 55 टक्के गाळ असल्याने बिकट स्थिती उद्भवली आहे. सद्यस्थितीत भुसावळ शहराला 12 ते 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार भुसावळ शहराची लोकसंख्या सुमारे दीड ते पावणे दोन लाख इतकी होती. त्यात आतापर्यंत झालेली वाढ लक्षात घेतली तर शहराची लोकसंख्या आता अडीच ते पावणे तीन लाखांवर गेली आहे. पाऊस लांबणीवर पडला तर भुसावळकरांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी कोणतीही व्यवस्था नाही. शहरात काही ठिकाणी नगरपालिकेने कूपनलिका खोदल्या आहेत. त्याचप्रमाणे भविष्यातील पाणी संकट लक्षात घेऊन आता काही दिवसांपूर्वीच नगरपालिकेने शहरातील चार सार्वजनिक विहिरींची स्वच्छता केली. पण या उपाययोजना तोकड्या आहेत.
अमळनेर
अमळनेर शहराला अमळनेर तालुक्यातील जळोद येथील तापी नदीपात्रातील डोहमधून पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत शहराला 8 ते 10 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तापी नदीपात्रातील डोहामध्ये असलेला जलसाठा अजून महिनाभर पुरू शकतो. मात्र, पाऊस लांबणीवर पडला तर अमळनेर शहरासाठी पर्यायी व्यवस्था नगरपालिकेने केली आहे. शहरात 25 ते 30 कूपनलिका तसेच नगरपालिकेच्या मालकीच्या 8 ते 10 सार्वजनिक विहिरी आहेत. त्याद्वारे पाणीपुरवठा होऊ शकतो. शिल्लक असलेला पाणीसाठा लक्षात घेता अमळनेर नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी पाणीकपात केली होती.
यावल
शहराला हतनूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत शहराला 3 ते 4 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हतनूर धरणातून कालव्याद्वारे पाणी यावल शहरातील साठवण तलावात आणण्यात येते. येथून पाईपलाईनद्वारे शहरात पाणीपुरवठा होतो. यावल शहरासाठी हतनूर धरणातून कालव्याद्वारे आवर्तन सोडले जाते. 15 एप्रिल रोजी आवर्तन सोडण्यात आले होते. ते साधारणपणे सव्वा दोन महिने पुरेल, असा अंदाज आहे. शहराला दररोज सुमारे 50 ते 60 लाख लीटर पाणी लागते. पाऊस लांबणीवर पडला तर नगरपालिकेच्या 3 सार्वजनिक विहिरी आहेत, त्याद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नगरपालिकेचे नियोजन आहे.
चोपडा
शहराला सद्यस्थितीत 8 ते 10 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. गुळ नदीवर असलेल्या गुळ मध्यम प्रकल्पासह तालुक्यातील कठोरा येथील तापी नदीपात्रातील नगरपालिकेच्या विहिरींवरून शहराला पाणीपुरवठा होत आहे. आजमितीस गुळ प्रकल्पात अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने तो जूनच्या पहिल्याच आठवड्यात संपुष्टात येईल. त्यानंतर परिस्थिती अजून बिकट होईल. पाऊस लांबला तर नगरपालिकेने कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही.
चाळीसगाव
नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील यांच्या चाळीसगाव शहराला नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गिरणा धरणात आजमितीस 11 टक्के पाणीसाठा शिल्लक असून चाळीसगावला 2 ते 3 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. गिरणा धरणात शिल्लक असलेला पाणीसाठा लक्षात घेता चाळीसगाव शहराला जुलै महिन्यापर्यंत पाणीपुरवठा होऊ शकतो. पाऊस लांबला तरी शहराला पाणी समस्या भेडसावणार नाही.
भडगाव