जळगाव - वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला असून ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा, मका पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव होत आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यात आता रब्बी हंगाम देखील धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यात एकूण साडेसात लाख हेक्टर क्षेत्र हे पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र मानले जाते. त्यात रब्बी हंगामात जवळपास दीड ते पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्रावर विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते. यावर्षी जळगाव जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १२५ ते १३० टक्के पर्जन्यमान झाले. नद्या, नाले, विहिरी तसेच कूपनलिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने रब्बी हंगामाच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. सिंचनासाठी पाण्याची समस्याच नसल्याने यावर्षी रब्बी हंगामात वार्षिक उद्दिष्टाच्या ११२ टक्के पेरणी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत झाली आहे. दरवर्षी जिल्ह्यातील १५ तालुक्यांत सर्वसाधारणपणे १ लाख ५५ हजार हेक्टरवर रब्बी हंगामाची पेरणी होते. मात्र, यावर्षी रब्बी हंगामाचा विक्रमी पेरा झाला असून तो १ लाख ७४ हजार हेक्टर इतका आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा आणि त्याखालोखाल गव्हाची लागवड झाली आहे. यात सुमारे ६० हजार हेक्टरवर हरभरा लागवड झाली असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जानेवारी अखेरीपर्यंत जिल्ह्यात ६५ ते ७० हजार हेक्टरवर हरभरा लागवड असेल, असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे गव्हाची पेरणी सुमारे ५४ हजार हेक्टर, मका ३५ हजार हेक्टर तर दादरची लागवड २५ हजार हेक्टरवर झाली आहे.