जळगाव -जिल्ह्यातून आतापर्यंत 74 हजार 494 शेतकऱ्यांचा तब्बल 25 लाख 55 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड यांनी दिली. जळगाव जिल्ह्यात कापूस पणन महासंघ, भारतीय कापूस निगम (सीसीआय) व खासगी बाजार समितीतर्फे कापूस खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा हा केळी आणि कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे जळगाव जिल्हा कापूस उत्पादनात आघाडीवर आहे.
जळगाव जिल्ह्यात 25 लाख 55 हजार क्विंटल कापसाची खरेदी - जळगाव कापूस बातमी
जळगाव जिल्ह्यातून आतापर्यंत 74 हजार 494 शेतकऱ्यांचा तब्बल 25 लाख 55 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड यांनी दिली.
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार कापूस विक्रीसाठी जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात कोरोनाविषाणूचा प्रादुर्भावानंतर कापूस विक्रीसाठी 40 हजार 839 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. जिल्ह्यात कापूस खरेदी सीसीआय यांच्यामार्फत 11 तालुक्यात एकूण 14 जिनिंग-प्रेसिंगमध्ये तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांच्यामार्फत चार तालुक्यात 14 जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये कोरोना विषयक राज्य शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करत शेतकऱ्यांकडील एफएक्यू प्रतीचा कापूस 5 हजार 110 ते 5 हजार 355 या भावाने खरेदी करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील 25 हजार 90 शेतकऱ्यांचा 7 लाख 85 हजार 908 क्विंटल कापूस खरेदी केलेला आहे. यापैकी 9 हजार 920 शेतकऱ्यांचा एक लाख 36 हजार 230 क्विंटल कापूस कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर खरेदी केलेला आहे. पणन महासंघातर्फे 27 हजार 682 शेतकऱ्यांचा 9 लाख 66 हजार 301 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. त्यापैकी 7 हजार 667 शेतकऱ्यांचा 2 लाख 73 हजार 171 क्विंटल कापूस हा कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर खरेदी करण्यात आला आहे, तर खासगी बाजार समिती मार्फत 8 हजार 586 शेतकऱ्यांचा 2 लाख 55 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. यापैकी 701 शेतकऱ्यांचा 21 हजार 449 क्विंटल कापूस कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भावानंतर खरेदी करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर कापूस विक्रीसाठी बाजार समितीकडे 40 हजार 839 शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली. त्यापैकी 17 हजार 527 शेतकऱ्यांचा कापूस पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याचा कापूस खरेदी केला गेला पाहिजे यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आग्रही राहिले असून तशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी 23 मे ला दिलेल्या आदेशाने बाजार समितीकडे कापूस विक्रीसाठी नाव-नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडे कापूस विक्रीसाठी शिल्लक आहे का, याची पडताळणी करण्यासाठी पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार पंचनामे करण्यात येत असून पंचनाम्यानुसार कापूस शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदीची प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत विहित कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.