जळगाव -मद्यतस्करी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांची शुक्रवारी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. शिरसाठ यांची मुख्यालयात बदली झाली असून, एमआयडीसी पोलीस ठाण्याचा पदभार तात्पुरत्या काळासाठी शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
शहरातील अजिंठा चौफुली परिसरातील आर. के. वाईन्स शॉपमधून लॉकडाऊनच्या काळात मद्याची तस्करी सुरू होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 12 एप्रिल रोजी पहाटे याठिकाणी छापा टाकून मद्यतस्करीचा डाव हाणून पाडला होता. याप्रकरणी सुरुवातीला 5 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक जीवन काशिनाथ पाटील, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संजय जगन्नाथ जाधव, मुख्यालयातील पोलीस नाईक मनोज केशव सुरवाडे तसेच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल भारत शांताराम पाटील यांचा देखील मद्यतस्करीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.