मुंबई -गेल्या 30 वर्षांपासून मागणी असलेल्या जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील खेडी आणि भोकर या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाच्या कामांसाठी 152 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली असल्याची माहिती जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
दोन्हीही खात्यांकडून 50-50टक्के खर्च
या प्रकल्पाचा खर्च जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मिळून उचलणार आहे. कोविड 19चा प्रादुर्भाव असूनही या संबंधीच्या बैठका सुरू होत्या. दोन्ही खात्याचे सचिव बैठका घेऊन या प्रकल्पासाठी दोन्हीही खात्यांकडून 50-50टक्के खर्च उचलण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे आता या पुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
शेतकरी-सर्वसामान्यांना दिलासा
या पुलामुळे हजारो शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे. खेडी-भोकर ते चोपडा हे अंतर 70 किलोमीटरचे आहे. मात्र हा पूल बांधण्यात आल्याने केवळ 15 किलोमीटर अंतर खेडी भोकर ते चोपडा असे होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तीन तालुके जोडले जाणार
हा पूल 600 मीटर लांब असून प्रत्येकी 30 मिटरचे 22 गाळे असणार आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूस 650 मीटर लांबीचे रस्ते असणार आहेत. या पुलामुळे चोपडा, जळगाव आणि धरणगाव हे तीन तालुके जोडले जाणार आहेत.
'ज्याच्या घरी पंगत तो बुंदी बाजूला काढतो'
या प्रकल्पाची अनेक वर्षे मागणी होत होती. पण माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी या प्रकल्पासाठी काहीही केले नाही. ज्याच्या घरी पंगत तो बुंदी बाजूला काढतो. मात्र त्यांनी काहीही केले नाही, असा टोळा यावेळी गुलाबराव पाटील यांनी महाजन यांना लगावला.