जळगाव -अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने त्वरित प्रतिहेक्टरी 25 हजार रुपये आर्थिक मदत करावी, या प्रमुख मागणीसाठी आज (25 नोव्हेंबर) दुपारी शिवसेनेच्या वतीने जळगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता.
जिल्ह्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून भीषण दुष्काळ होता. त्यानंतर यावर्षी चांगला पाऊस झाला. पिकेही उत्तम होती. मात्र, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. उडीद, मूग, ज्वारी, बाजरी यासारख्या कडधान्य पीकांसह मका, सोयाबीन, कापूस ही नगदी पिकेही हातून गेली. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी किमान 25 हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविम्याची रक्कम त्वरित जमा करावी, यासारख्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर तहसीलदार वैशाली हिंगे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान, शिवसेनेच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.