जळगावातील रस्त्यांचा विषय ऐरणीवर; काँग्रेस-राष्ट्रवादीकडून महापालिका प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा!
रस्ते दुरुस्तीची मागणी करून देखील महापालिका प्रशासन काहीही हालचाल करत नसल्याने, बुधवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. आमदार भोळे यांनी २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी 'चिड येते ना खड्ड्यांची, लाज वाटतेय ना खड्ड्यांची' या मथळ्याखाली शहरभर फलक लावले होते. याच फलकांचा आधार घेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भोळेंविरुद्ध घोषणाबाजी केली.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेले लक्षवेधी आंदोलन
जळगाव - शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले असून, नागरिकांचे हकनाक बळी जात आहेत. या समस्येमुळे महापालिकेविरुद्ध जनक्षोभ वाढत आहे. बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत संताप व्यक्त केला. तर जळगाव जिल्हा वकील संघ तसेच रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे.
वकील संघ व रोटरी क्लबचेही निवेदन-
शहरातील रस्त्यांच्या विषयासंदर्भात जळगाव जिल्हा वकील संघ तसेच रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांची भेट घेतली. रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करत आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.