जळगाव - जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील नाडगाव-कोल्हाडी रस्त्यावर असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एका प्राध्यापकाने कनिष्ठ लिपिक महिला कर्मचाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे.
चंदा उमेश गरकळ (वय ३२) असे चाकू हल्ला झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर कपूरचंद पाटील असे चंदा यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या प्राध्यापकाचे नाव आहे. या घटनेत चंदा यांच्या मानेजवळ तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुधवारी सकाळी चंदा गरकळ या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकट्या असल्याचा फायदा घेत खोलीचे दार बंद करून कपूरचंद याने त्यांच्यावर चाकूहल्ला केल्याचा आरोप आहे. कपूरचंद याने चंदा यांच्यावर चाकूहल्ला केल्यानंतर स्वतःच्या अंगावर देखील चाकूने वार केल्याची माहिती आहे. हा प्रकार घडल्यानंतर विद्यार्थ्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चंदा यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले.
एकतर्फी प्रेमातून कनिष्ठ लिपिक महिलेवर प्राध्यापकाचा प्राणघातक चाकूहल्ला
कपूरचंद पाटील हा गेल्या काही दिवसांपासून आपल्या पत्नीचा छळ करीत होता. याबाबत आपल्या पत्नीच्या जीविताला धोका असल्याची तक्रार वरिष्ठ अधिकारी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संचालकांकडे केली होती. मात्र, त्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप चंदा यांचे पती उमेश गरकळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
एकतर्फी प्रेमातून घडला प्रकार?
दरम्यान, हा प्रकार एकतर्फी प्रेमातून घडल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. कपूरचंद पाटील हा गेल्या काही दिवसांपासून चंदा यांच्या भ्रमणध्वनीवर फेसबुक, व्हॉट्स अॅप या समाज माध्यमांवर अश्लील चित्रफिती पाठवत होता. मात्र, त्याला चंदा यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्याने रागाच्या भरातून असे टोकाचे पाऊल उचलले, अशी प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.