महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वतः पदरमोड करून प्रशासकीय अधिकारी घडवणारा प्राध्यापक; जळगावातील जयेंद्र लेकुरवाळे यांचे समाजासाठी आदर्शवत कार्य!

विद्यार्थ्यांना आपल्या गावातच राहून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता यावा, म्हणून लेकुरवाळे दाम्पत्याने 'स्पर्धा परीक्षा ग्राम' ही संकल्पना आणली. या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी 2008 मध्ये त्यांनी सुरुवातीला भुसावळ तालुक्यातील मोंढाळा गावाची निवड केली. याठिकाणी कामाला सुरुवात करण्यापूर्वी महात्मा फुले यांच्याप्रमाणे 'आधी केले मग सांगितले' या उक्तीनुसार दोघांनी विद्यार्थ्यांना हवं ते उपलब्ध करून देण्यासाठी स्वतः पदरमोड केली.

प्रशासकीय अधिकारी घडवणारा प्राध्यापक
प्रशासकीय अधिकारी घडवणारा प्राध्यापक

By

Published : Sep 5, 2021, 8:23 AM IST

Updated : Sep 5, 2021, 8:36 AM IST

जळगाव -ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी जिद्द अन चिकाटी असते. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले, तर ते निश्चितच यशाचे शिखर गाठतात. हीच बाब जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रहिवासी असलेले प्रा. डॉ. जयेंद्र दिनकर लेकुरवाळे यांनी सिद्ध करून दाखवली आहे. 'समाजाचं आपण काही देणं लागतो', या उदात्त भावनेतून प्रा. लेकुरवाळे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची चळवळ उभारली आहे. यासाठी त्यांनी स्वतः पदरमोड करून विद्यार्थ्यांना हवं ते उपलब्ध करून दिले.

या चळवळीला तब्बल 12 वर्षे म्हणजेच, एका तपाचा सुवर्ण इतिहास आहे. विशेष म्हणजे, या काळात त्यांच्या शेकडो विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न साकार झाले आहे. यात एकाच गावातील 35 विद्यार्थी विविध प्रशासकीय विभागांमध्ये चांगल्या पदांवर अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. निरपेक्ष भावनेतून सुरू असलेले प्रा. लेकुरवाळे यांचे कार्य निश्चितच समाजाला प्रेरणा देणारे आहे. शिक्षक दिनानिमित्त 'ईटीव्ही भारत'ने त्यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

प्रशासकीय अधिकारी घडवणारा प्राध्यापक
प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे हे जळगावातील अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात 2007 पासून प्राध्यापक म्हणून सेवारत आहेत. तत्पूर्वी ते नाशिकच्या भोसला मिल्ट्री कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. विद्यार्थी दशेपासूनच त्यांना स्पर्धा परीक्षेचे विशेष आकर्षण होते. पुण्यात शिक्षण घेत असताना त्यांच्या सोबतच्या अनेक मित्रांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच अधिकारी होण्याची स्वप्नपूर्ती झाली होती. हा अनुभव गाठीशी असल्याने बेंडाळे महिला महाविद्यालयात नोकरीला सुरुवात केल्यानंतर, त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि तेथूनच खऱ्या अर्थाने प्रा. लेकुरवाळे यांनी लावलेल्या स्पर्धा परीक्षेच्या चळवळीच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर व्हायला सुरुवात झाली.
प्रशासकीय अधिकारी घडवणारा प्राध्यापक
कशाला हवं मुंबई, पुणे अन दिल्ली-स्पर्धा परीक्षेचे क्षेत्र म्हटलं की अभ्यासासाठी मुंबई, पुणे, दिल्ली यासारख्या महानगरांमध्ये जावे लागते, हा समज रूढ झाला आहे. परंतु, अशा महानगरांमध्ये अभ्यासासाठी जाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. काही विद्यार्थी मोठ्या हिंमतीने स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी महानगरांची वाट धरतात देखील; पण अभ्यासाचा ताण, अपेक्षांचे ओझे अशातच ते गुरफटतात. त्यामुळे पदरी अपयश येते. ही बाब प्रा. लेकुरवाळे जाणून होते. म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या गावातच मार्गदर्शन करायला सुरुवात केली. गावातच अभ्यासासाठी पूरक वातावरण मिळाल्याने त्यांचे विद्यार्थी यशस्वी होऊ लागले. जसजसा यशस्वी विद्यार्थी संख्येचा आलेख वाढू लागला, तसतसा त्यांचाही उत्साह वाढत गेला. एकूणच काय तर प्रा. लेकुरवाळे यांनी, स्पर्धा परीक्षा म्हणजे मुंबई-पुणे ही संकल्पनाच मोडीत काढली.
प्रशासकीय अधिकारी घडवणारा प्राध्यापक
अर्धांगिनीचीही मिळाली साथ-प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांना या विधायक कार्यात त्यांच्या पत्नी शीतल लेकुरवाळे यांचीही साथ लाभली आहे. त्या स्वतः राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अधिकारी झाल्या आहेत. त्या सध्या जळगावातील भूमी अभिलेख विभागात उपअधीक्षक पदावर सेवारत आहेत. शीतल लेकुरवाळे या वेळ मिळेल तसा स्पर्धा परीक्षेच्या चळवळीला हातभार लावत असतात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, पुस्तके व इतर साहित्य उपलब्ध करून देणे, या कामात त्या पती जयेंद्र यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या असतात. 'प्रा. डॉ. लेकुरवाळे हे सातत्याने माझ्या विद्यार्थ्यांचे काय? या भावनेतून विचार करत असतात. त्यांनी सुरू केलेली स्पर्धा परीक्षेची चळवळ ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्वप्न पूर्तीची उमेद निर्माण करणारी आहे. त्यामुळे साहजिकच मलाही त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची प्रेरणा मिळाली. मला जसा वेळ मिळतो, तसा या चळवळीला हातभार लावत असते', अशी भावना शीतल लेकुरवाळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली. स्पर्धा परीक्षा ग्राम संकल्पना, 'आधी केले मग सांगितले'- विद्यार्थ्यांना आपल्या गावातच राहून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता यावा, म्हणून लेकुरवाळे दाम्पत्याने 'स्पर्धा परीक्षा ग्राम' ही संकल्पना आणली. या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी 2008 मध्ये त्यांनी सुरुवातीला भुसावळ तालुक्यातील मोंढाळा गावाची निवड केली. याठिकाणी कामाला सुरुवात करण्यापूर्वी महात्मा फुले यांच्याप्रमाणे 'आधी केले मग सांगितले' या उक्तीनुसार दोघांनी विद्यार्थ्यांना हवं ते उपलब्ध करून देण्यासाठी स्वतः पदरमोड केली. हळूहळू त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू लागले. विद्यार्थी अधिकारी होऊ लागले. मग लेकुरवाळे दाम्पत्याने सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षेच्या चळवळीला लोकसहभागाची साथ मिळू लागली. पुढे गावकरी, लोकप्रतिनिधी तसेच समाजातील दानशूर व्यक्तींच्या पाठबळाच्या जोरावर त्यांनी गावात एक सुसज्ज वाचनालय उभारले. याठिकाणी विद्यार्थी गोडीने अभ्यासाला येतात. मोंढाळा या एकाच गावातील 35 विद्यार्थी विविध प्रशासकीय विभागांच्या सेवेत दाखल झाले आहेत. प्रा. लेकुरवाळे यांनी सुरू केलेल्या चळवळीला अधिकारी झालेल्या विद्यार्थ्यांचीही साथ मिळत आहे. गावातील इतर विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळत असून, ते पण जोमाने अभ्यास करू लागले आहेत.
प्रशासकीय अधिकारी घडवणारा प्राध्यापक
कोण पोलीस अधिकारी, तर कोण बँकेत अधिकारी-प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांचे अनेक विद्यार्थी आज उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्यापैकी कुणी पोलीस अधिकारी आहे, तर कुणी बँकेत अधिकारी आहे. शिक्षक, आरोग्य कर्मचारी, पोलीस शिपाई, तलाठी अशा पदांवर अनेक जण कार्यरत आहेत. सैन्य दलातही अनेक विद्यार्थी कार्यरत असून, ते भारत मातेचे रक्षण करत आहेत. 'प्रा. लेकुरवाळे यांनी पुढाकार घेतल्याने आमच्या गावातील विद्यार्थ्यांना योग्य मार्ग मिळाला आहे. आज गावातील जे विद्यार्थी प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत, त्याचे श्रेय लेकुरवाळे सरांनाच जाते', अशी प्रतिक्रिया मोंढाळा गावातील ग्रामस्थ विजय घ्यार यांनी व्यक्त केली. तर, 'माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी पुढे काय या विचारात होतो. अशातच मला लेकुरवाळे सरांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मुळेच मी राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक होऊ शकलो. आज मी जे काही यश मिळवले आहे, ते केवळ सरांमुळे आहे', अशी भावना निलेश गायकवाड या विद्यार्थ्यांने व्यक्त केली. अजून 5 गावांमध्ये स्पर्धा ग्राम संकल्पना सुरू करण्याचा मनोदय-स्पर्धा परीक्षा ग्राम संकल्पनेबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे म्हणाले की, स्पर्धा परीक्षा ग्राम ही संकल्पना मोंढाळा यशस्वीरित्या राबवली आहे. या संकल्पनेला मिळालेल्या यशानंतर आमचा उत्साह वाढला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गावातच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता यावा, या उद्देशाने आम्ही भविष्यात जिल्ह्यातील 5 प्रमुख गावांमध्ये ही संकल्पना राबवणार आहोत. विशेष म्हणजे, या गावांपैकी प्रत्येक गावाला आजूबाजूची गावे जोडलेली असतील. साखळी पद्धतीने पुढे जाऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असते. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते संधीचे सोने करतात, असेही प्रा. लेकुरवाळे यावेळी म्हणाले.
Last Updated : Sep 5, 2021, 8:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details