जळगाव -जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी गावात गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर गुन्ह्यातून जामिनावर सुटलेल्या एका आरोपीचे त्याच्या साथीदारांनी गावात जंगी स्वागत करत मिरवणूक काढली. ढोल-ताशांच्या गजरात आरोपीला फुलांचा हार घालून मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे, काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गावातून दुचाकींची रॅलीही काढली. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
भाई का वेलकम -
अफसर खाटीक असे जामिनावर सुटलेल्या संशयित आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी शेंदूर्णी गावात गुन्हेगारीची घटना घडली होती. त्यात पोलिसांनी 8 जणांना अटक केली होती. त्यात अफसर खाटीक याचाही संशयित आरोपी म्हणून समावेश होता. त्याला नुकताच या गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर सुटका झाल्यावर तो गावात आला. तेव्हा त्याच्या साथीदारांनी गावात जंगी स्वागत करत त्याची मिरवणूक काढली. 'भाई का वेलकम' म्हणत ही मिरवणूक काढण्यात आली.