जळगाव - बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या मुहूर्तावर सोने तसेच चांदी खरेदीला विशेष महत्त्व आहे. जळगावच्या सराफ बाजारात पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी उसळली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सराफ बाजारात शुकशुकाट होता. मात्र, दिवाळीच्या काळात ग्राहकांच्या गर्दीने सराफ बाजार गजबजून गेला असून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.
दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा तसेच उत्साहाचा सण मानला जातो. अश्विनातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. यादिवशी सोने खरेदीला खूप महत्त्व आहे. त्या दृष्टीने नागरिकांनी सोने तसेच चांदी खरेदीचे नियोजन केले आहे. दिवाळी पाडव्याला सोने खरेदीसह सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात अशा अनेक बाजूंनी दिवाळी पाडव्याचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे.
हेही वाचा -जळगावात मुसळधार पाऊस; बाजारपेठेत उडाली तारांबळ
यावर्षीच्या पाडव्याला सकाळी 9 ते 11 पर्यंत शुभ मुहूर्त होता. त्याचप्रमाणे दुपारी 12.30 ते 2 अमृत, दुपारी 3.30 ते सायंकाळी 5 पर्यंत लाभ आणि सायंकाळी 5 ते 6.30 पर्यंत पुन्हा अमृत कालावधी असल्याने या मुहूर्तांवर सोने खरेदीसाठी नागरिकांनी सराफ बाजार गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.