महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; वादळाने केळीचे नुकसान - banana crop

वादळामुळे अनेक गावांमध्ये घरे तसेच जनावरांच्या गोठ्यांवरील पत्रे उडाली. रावेर आणि यावल तालुक्यात केळी बागांचे वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे.

वादळी पाऊस

By

Published : Jun 7, 2019, 11:43 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील जळगाव, रावेर आणि यावल तालुक्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने आज (शुक्रवार) सायंकाळी जोरदार हजेरी लावली. वादळामुळे अनेक गावांमध्ये घरे तसेच जनावरांच्या गोठ्यांवरील पत्रे उडाली. रावेर आणि यावल तालुक्यात केळी बागांचे वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. विजेचे खांब, वृक्ष देखील उन्मळून पडले आहेत.

वादळी पाऊस

आज सायंकाळी सहा ते साडेसहा वाजताच्या सुमारास जळगाव, रावेर आणि यावल तालुक्यातील गावांमध्ये वादळासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, वादळामुळे केळी बागा अक्षरशः आडव्या झाल्या.

यापूर्वी देखील १ जूनला याच तालुक्यांमध्ये वादळी मान्सूनपूर्व पाऊस झाला होता. त्यावेळी देखील केळी बागांचे नुकसान झाले होते. कापणीवर आलेली केळी वादळामुळे वाया गेली आहे. केळीचे घड तुटून जमिनीवर पडले. रावेर शहरात वादळामुळे ठिकठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. अनेक दुकाने आणि घरांवरील पत्रे देखील उडून गेले. सुदैवाने वादळामुळे कोठेही जीवितहानी झाली नाही. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर वृक्ष उन्मळून पडले.

जळगाव तालुक्यातील किनोद, नांदगाव, भोकर या गावांमध्ये वादळामुळे केळीचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. वादळामुळे केळीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details