जळगाव -बुधवारपासून ग्रामपंचायतींच्या नामनिर्देशनाला सुरुवात होत आहे. निवडणूक होणाऱ्या गावांमध्ये शांतता व कायदा सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. रावेर पोलिस ठाण्यांतर्गत निवडणूक होणाऱ्या १६ गावांमधील १८३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.
कारवाई प्रक्रिया सुरु
तालुक्यातील एकूण ४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरु होत आहे. निवडणूक काळात संबंधित गावांमध्ये शांतता कायम रहावी, कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी पोलिस प्रशासनाने घेतली आहे. रावेर तालुक्यात रावेर , निंभोरा व सावदा या तीन पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील निवडणूक होणाऱ्या गावांमध्ये उपाययोजना आखल्या जात आहेत. रावेर पोलिस ठाण्याअंतर्गत २१ गावांमध्ये निवडणूक होत आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी गावातील १८३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.