जळगाव -लोकसभा निवडणुकीत आमची खरी लढाई भाजप आणि शिवसेना युतीशी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या रेसमध्ये कुठेही नसून आम्ही त्यांना गृहीत धरतच नाही, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज जळगावात केले.
आमची खरी लढाई युतीशी, आघाडीला आम्ही गृहीत धरत नाही - आंबेडकर लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव आणि रावेर मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी जळगावात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या रेसमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांची आघाडी कुठेही नाही. नांदेडसारख्या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निवडणूक लढवावी की, त्यांच्या पत्नीने निवडणूक लढवावी, अशी बिकट परिस्थिती आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाचीच अशी गत असेल तर इतरंच काय, असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला.
शरद पवारांची माघार काँग्रेस-राष्ट्रवादीला मारक -
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांनी निवडणुकीपूर्वी झालेल्या सर्व्हेचा अहवाल आल्यावर माघार घेतली. शरद पवारांनी माघार घेणे, हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला परिस्थिती अनुकूल नसल्याचे संकेत आहेत. पवारांची माघार काँग्रेस-राष्ट्रवादीला मारक आहे, असेही आंबेडकर म्हणाले. यावेळी त्यांनी राजकारणातील घराणेशाहीवर देखील जोरदार टीका केली. या आधी मुठभर कुटुंबातील सदस्यांनाच उमेदवाऱ्या देण्यात आल्या होत्या. हे कधी लोकांच्या लक्षात आले नाही किंवा राजकीय पक्षांनी देखील तसे दाखवले नाही. हीच बाब आम्ही यावेळी दाखवून दिली. विकास साधायचा असेल तर सत्ता एका विशिष्ट कुटुंबाच्या हाती नको. तसे झाले तर विरोधी पक्ष नावालाच उरतो, असेही मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.