जळगाव -आरएसएस आणि भाजप दोन्ही ब्लॅकमेलर आहेत. त्यांनी मलाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता, अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी दुपारी जळगावात लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांसाठी जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ते बोलत होते.
जळगावात प्रचार सभेदरम्यान बोलताना अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मोदींचा खून करण्याच्या कटामध्ये प्रकाश आंबेडकर होते, असा चुकीचा प्रचार करण्यात आला. असे असले तर मला पहिल्यांदा पकडा. २ महिने तुरुंगामध्ये आराम करणार. मोदींचे सरकार गेल्यानंतर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या पोलिसवाल्यांनाही चौकात टांगून फटके मारल्याशिवाय राहणार नसल्याचे ते म्हणाले.
जे सरकार नितीमत्तेचे नाही आणि पंतप्रधानांना मारणार म्हणून सहानुभूती मिळवायची, अशा राजकारणाला मूठमाती द्या. वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने उभे रहा. क्रिकेटमध्ये जसे मॅच फिक्सिंग होते. अगदी तशाच प्रकारे मोदींनी आपला विरोधक फिक्स केला आहे. राहुल गांधी विरोधक असून माझी लढाई राहुल गांधीबरोबर आहे, अशा स्वप्नांच्या जगात मोदी वावरत आहेत. मात्र, वास्तवात वातावरण त्यांच्या विरोधात आहे. राज्याराज्यात विरोधकांची लाट आहे. मोदींचा सामना हा काँग्रेससोबत नाहीतर राज्यांच्या प्रादेशिक पक्षांबरोबर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आज कुठेच नाहीत. आपला सामना हा सेना-भाजपशी आहे, असेही ते म्हणाले.
आरएसएस-भाजप हे गोळ्या चालवणारे -
गांधी विचारांचे असल्याचे काँग्रेसवाले म्हणतात. मात्र, गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्यावेळी एकही काँग्रेसवाला निषेध करताना दिसला नाही. आरएसएस-भाजप हे गोळ्या चालवणारे आहेत. गांधी शांततेच्या मार्गाने जाणारे होते. पण काँग्रेस आज शांततेचा मार्ग टिकवू शकली नाही, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.