जळगाव - प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे महाशिवरात्री निमित्ताने शहरातील ओंकारेश्वर मंदिरासमोरील परिसरात तीस फुटी बेलपत्राचे शिवलिंग साकारले आहे. या विशाल शिवलिंगाच्या दर्शनासाठी सोमवारी पहाटेपासून भाविकांची गर्दी होत आहे. त्याचप्रमाणे सामाजिक आशय देणाऱ्या विविध आरासही प्रभावी ठरल्या आहेत. हे शिवलिंग 3 ते 5 मार्चपर्यंत भाविकांसाठी दर्शनासाठी खुले असणार आहे.
ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, ओंकारेश्वर मंदिर परिसरात प्रथमच ऐतिहासिक, भव्य शिवलिंगाचे निर्माण करण्यात आले आहे. भाविकांना जळगाव जिल्ह्यात प्रथमच इतके मोठ्या शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे.
सामाजिक आशयासाठी विविध आरास-
व्यसनमुक्तीसाठी प्रतिकात्मक यज्ञकुंडात व्यसनांची आहुती टाकून व्यसनमुक्त समाज घडविणारा स्टॉल, आत्मशक्ती, सर्वोच्च सत्ता, स्वर्णीम दुनिया आदिबरोबर प्रोजेक्टरद्वारे राजयोग अनुभूती अभ्यास व इतर स्टॉलही शिवलिंगाच्या आजूबाजूस आहेत. महाशिवरात्रीनिमित्त सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता प्रतिदिवस महाआरतीचे आयोजन असून पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत शिवभक्तांसाठी शिवलिंग दर्शनार्थ खुले असणार आहे.
दर्शनासाठी शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी-
सोमवारी पहाटेपासून शहरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. महाबळ रस्त्यावरील ओंकारेश्वर मंदिर, निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिर, पांजरपोळ संस्था येथील पुरातन शिवमंदिर तसेच एमआयडीसीतील विश्वनाथ महादेव मंदिरात पहाटेपासून अभिषेक पूजन, महाआरती तसेच रुद्राभिषेक करण्यात आले. या मंदिरांमध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
सामाजिक आशयासाठी विविध आरास