जळगाव - जामनेर येथील प्रफुल्ल लोढा यांनी काल (शुक्रवारी) जळगावात पत्रकार परिषद घेवून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. आज (शनिवारी) दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून प्रफुल्ल लोढा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. तसेच लोढा पक्षाचे साधे सदस्य नाहीत, असे रवींद्र पाटील म्हणाले.
दरम्यान, खडसे यांना राजकीय द्वेषातूनच ईडीची नोटीस पाठविण्यात आली असल्याचा आरोप देखील रवींद्र पाटील यांनी केला आहे.
लोढा यांनी काल खडसेंवर केला होता आरोप-
राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे सांगत जामेनर येथील प्रफुल्ल लोढा यांनी काल शुक्रवारी जळगावात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केले होते. महाजन यांच्या गैरकृत्याची फाईल शोधण्यासाठी खडसे यांच्या सांगण्यावरुनच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माझ्या व मित्राच्या घराची झडती घेतली, असा आरोप करीत लोढा यांनी खडसे गलिच्छ राजकारण करीत असल्याची टीका केली होती.
अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार-
याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेवून जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी प्रफुल्ल लोढा यांचा राष्ट्रवादीशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. तसेच लोढा यांनी एकनाथ खडसे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करुन त्यांची बदनामी केली आहे. त्यामुळे खडसे त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचेही रवींद्र पाटील यांनी सांगितले.