महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 16, 2020, 11:56 PM IST

ETV Bharat / state

जळगाव : कापूस उत्पादन यावर्षी 25 ते 30 टक्क्यांनी घटण्याची शक्यता; अतिवृष्टीसह गुलाबी बोंडअळीचा फटका

अतिवृष्टी आणि नंतर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे पूर्व हंगामी तसेच हंगामी कापसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यावर्षी जळगाव जिल्ह्यातील कापसाचे उत्पादन सुमारे 25 ते 30 टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.

Possibility of decreased in cotton production 20 to 30 % in Jalgaon district
जळगाव : कापूस उत्पादन यावर्षी 25 ते 30 टक्क्यांनी घटण्याची शक्यता; अतिवृष्टीसह गुलाबी बोंडअळीचा फटका

जळगाव -राज्यातील प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यांपैकी एक जिल्हा म्हणून जळगाव जिल्ह्याची ओळख आहे. परंतु, यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी आणि नंतर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे पूर्वहंगामी तसेच हंगामी कापसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यावर्षी जिल्ह्यातील कापसाचे उत्पादन सुमारे 25 ते 30 टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका तर बसलाच आहे, शिवाय जिल्ह्यातील जिनिंग व प्रेसिंग उद्योगावर देखील काहीअंशी विपरीत परिणाम होणार आहे.

यावर्षी जळगावात कापूस उत्पादन 25 ते 30 टक्क्यांनी घटण्याची शक्यता....

जळगाव जिल्ह्याचे एकूण लागवडीखालील क्षेत्र सुमारे साडेसात लाख हेक्टर आहे. त्यापैकी सर्वाधिक क्षेत्र हे कापूस या नगदी पिकाचे असते. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी खरीप हंगामात पूर्वहंगामी आणि हंगामी कापसाची लागवड करतात. जिल्ह्यातील एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र हे कापसाचे असते. त्यातही एक ते सव्वा लाख हेक्टर क्षेत्र हे पूर्वहंगामी कापसाचे असते. गेल्या वर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस पडला होता. त्यामुळे यावर्षी खरिपात पूर्वहंगामी कापसाची लागवड वाढली होती. परंतु, पुढे अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पाऊस लांबल्याने कापसावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. यामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. संपूर्ण खरीप हंगामातील स्थितीचा विचार केला तर कापसाच्या उत्पादनात सुमारे 25 ते 30 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खरिपात 17 ते 18 लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित
जिल्ह्यातील कापसाच्या सरासरी उत्पादनाचा विचार केला, तर दरवर्षी जिल्ह्यात पूर्वहंगामी आणि हंगामी मिळून कापसाचे सुमारे 20 ते 22 लाख गाठींचे उत्पादन होते. परंतु, यावर्षी अतिवृष्टी आणि गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता उत्पादनात 25 ते 30 टक्के घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादन 17 ते 18 लाख गाठींपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात दरवर्षी कापसाचे प्रतिहेक्टरी उत्पादन 350 ते 400 किलो रुई असे असते. यावर्षी हेच उत्पादन प्रतिहेक्टरी 200 ते 250 किलो रुईपर्यंत येण्याचा अंदाज आहे. कापसाच्या उत्पादनाची सरासरी पाहता शेतकऱ्यांना प्रतिएकरी अवघे तीन ते साडेतीन क्विंटल कापूस पिकला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नसल्याची स्थिती आहे.

बोंडअळीमुळे फरदडचे उत्पादन घेणे अशक्य
कापूस उत्पादक शेतकरी दरवर्षी खरीप हंगामाच्या उत्तरार्धात कापूस पिकाचा शेवटचा एक बहर घेतात. त्याला फरदड म्हटले जाते. फरदडच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात किमान 5 ते 10 टक्के उत्पादन वाढ अपेक्षित असते. परंतु, यावर्षी कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने फरदडचे उत्पादन घेणे शक्य नाही. अनेक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीसच कापूस उपटून फेकला आहे. त्यामुळे हा फटका देखील शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.

शेतकरी म्हणतात आता कापूस पीक परवडत नाही!
कापसाच्या उत्पादनात यावर्षी मोठ्या प्रमाणावर घट येणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. या विषयासंदर्भात धरणगाव तालुक्यातील भोणे येथील शेतकरी चिंतामण पाटील 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले की, यावर्षी अतिवृष्टी आणि गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावमुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. एकरी अवघे अडीच ते तीन क्विंटल उत्पादन आले आहे. पूर्वी बीटी तंत्रज्ञान नसतानाही एकरी 8 ते 10 क्विंटल कापूस पिकत होता. आता मात्र, बीटी तंत्रज्ञान असूनही कापसाच्या उत्पादनात सातत्याने घट होत आहे. बदलते हवामान आणि रसायनांच्या अमर्याद वापरामुळे कापसाच्या पिकावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे भविष्यात बीटी तंत्रज्ञान असूनही कापसाच्या उत्पादनात वाढ होऊ शकत नाही. म्हणून बीटी तंत्रज्ञानाच्या पुढचे संशोधन होण्याची गरज आहे. यावर्षी तर कापसाच्या उत्पादनाचा विचार केला तर शेतीत टाकलेला खर्चही निघणार नाही, अशी खंत चिंतामण पाटील यांनी व्यक्त केली.

कापूस पिकाने दिला दगा
भोणे येथील शेतकरी दिनेश पाटील म्हणाले की, यावर्षी कापूस पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला आहे. वाढता उत्पादन खर्च आणि प्रत्यक्षात हाती आलेले उत्पन्न यात खूपच तफावत आहे. यावर्षी अतिवृष्टी आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावमुळे तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खूपच फटका बसला आहे. सद्यस्थितीत कापसाला बियाणे, फवारणी तसेच मजुरी असे मिळून एकरी 22 ते 23 हजार खर्च येत आहे. हाती आलेले उत्पन्न आणि उत्पादन खर्च याचा विचार केला तर शेतकऱ्यांना एकरी 2 ते 3 हजार उत्पन्न मिळाले आहे. दरवर्षी कापसाचा उत्पादन खर्च वाढत आहे. तुलनेत उत्पादन निघत नसल्याने आता कापसाची लागवड करावी की नाही, असा प्रश्न आहे, असे दिनेश पाटील यांनी सांगितले.

जिनिंग व प्रेसिंग उद्योगावरही होणार परिणाम
दरम्यान, यावर्षी कापसाच्या उत्पादनात घट होणार असल्याने जिनिंग व प्रेसिंग उद्योगावरही परिणाम होणार आहे. याबाबत बोलताना खान्देश जिनिंग व प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी सांगितले की, यावर्षी खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्यातील काही भागात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. अतिवृष्टी, बोंडअळीचा प्रादुर्भाव अशा नैसर्गिक आपत्तीमुळे यावर्षी कापूस उत्पादनाला 20 ते 25 टक्के फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाच्या गाठी निर्मितीच्या प्रक्रियेवर 10 ते 15 टक्के परिणाम होण्याचा अंदाज आहे. सद्यस्थितीत जिनिंग कमी क्षमतेने सुरू आहेत, असे प्रदीप जैन म्हणाले.

उत्पादनात घट, मात्र निर्यातीवर होणार नाही परिणाम
यावर्षी कापसाच्या उत्पादनात घट होणार असली तरी निर्यातीवर मात्र परिणाम होणार नसल्याचेही प्रदीप जैन यांनी सांगितले. यावर्षीच्या हंगामाच्या अखेरपर्यंत एकट्या खान्देशातील सुमारे दीडशे जिनिंग व प्रेसिंग कारखान्यांतून 20 ते 22 लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कापसाचे उत्पादन घटले आहे. पण तामिळनाडू, मध्यप्रदेश, कर्नाटक तसेच तेलंगणा राज्यात कापसाचे सरासरी उत्पादन झाले आहे. याशिवाय बड्या जिनर्सकडे मागील वर्षाचा बफर स्टॉक असल्याने भारतातून यावर्षी मोठ्या प्रमाणावर कापूस निर्यात होईल. विशेष म्हणजे, यावर्षी चीनसह बांग्लादेशातून भारतीय कापसाला मोठी मागणी असल्याचे प्रदीप जैन यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details