जळगाव- शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जेवणाचा पुरवठा करणारा ठेकेदार वेळेवर जेवण पुरवत नाही, जेवणाचा दर्जा अतिशय निकृष्ट असतो, नियमानुसार रुग्णांना दररोज वेगवेगळ्या प्रकारचे फळे देणे अपेक्षित असताना फक्त केळी दिली जाते, अशा एक नाही तर अनेक तक्रारी कोविड सेंटरमधले रुग्ण करत आहेत. या तक्रारींची दखल घेऊन सोमवारी भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली आहे. त्यांनी रुग्णांच्या तक्रारीविषयी अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.
जेवणाचा दर्जा अतिशय निकृष्ट
जळगाव शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात कोविड सेंटर उभारले आहे. सद्यस्थितीत या कोविड सेंटरमध्ये शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. या रुग्णांना दररोज दोन वेळचा नाश्ता व जेवण देण्यासाठी महापालिका प्रशासनाने पूजा केटरर्स नावाच्या संस्थेला ठेका दिला आहे. त्यानुसार ठेकेदाराला प्रतिव्यक्ती 140 रुपये महापालिका प्रशासन अदा करत आहे. मात्र, असे असताना ठेकेदाराकडून पुरवल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत.
दोन दिवसांपासून वाढल्या होत्या तक्रारी