जळगाव -जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या ५ हजार १५४ जागांसाठी उद्या (शुक्रवारी) मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी आज (गुरुवारी) दुपारी प्रत्येक तहसील कार्यालयाच्यावतीने मतदान केंद्रांवर इव्हीएम मशिन्स तसेच मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली सामग्री रवाना करण्यात आली. जिल्हाभरात ५ हजार १५४ जागांसाठी एकूण १३ हजार ८४७ उमेदवार रिंगणात आहेत.
मतदान प्रक्रियेसाठी १३ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती -
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात दोन हजार ४१५ मतदान केंद्रे आहेत. त्यावर १३ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महसूल प्रशासनासह शिक्षकांचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यातील २० हजार २६४ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यात २८८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते, तर १९ हजार ९७६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. माघारीच्या दिवशी सहा हजार १२९ उमेदवारांनी माघार घेतली होती. तर जिल्ह्यातील ९३ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत.
जिल्ह्यात निवडणुकीसाठी २ हजार ४१५ मतदान केंद्र -
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २ हजार ४१५ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. एका केंद्रावर साधारणत: ८०० मतदारांना मतदान करता येणार आहेत. या मतदान केंद्रांमध्ये जळगाव १७०, जामनेर २३६, धरणगाव १२२, भडगाव ९९, रावेर १६५, यावल १७९, बोदवड ८०, अमळनेर १५४, पाचोरा २९५, भुसावळ ११८, एरंडोल ११८, पारोळा १३०, चाळीसगाव २३७, मुक्ताईनगर १५१, चोपडा १६१, असे एकूण २ हजार ४१५ मतदान केंद्र आहेत.
तालुकानिहाय उमेदवारांची संख्या -
जळगाव तालुक्यात ४६३ जागांसाठी १०२४ उमेदवार रिंगणात आहे. तर जामनेरमध्ये ७०५ जागांसाठी १३९६ उमेदवार, धरणगाव ४०३ जागांसाठी ७९१ उमेदवार, एरंडोल ३३३ जागांसाठी ६१६ उमेदवार, पारोळा ५०६ जागांसाठी ८६० उमेदवार, भुसावळ २८० जागांसाठी ६४६ उमेदवार, मुक्ताईनगर ४५३ जागांसाठी ८५३ उमेदवार, बोदवड २३७ जागांसाठी ४४९ उमेदवार, यावल ४६९ जागांसाठी ९९० उमेदवार, रावेर ४५२ जागांसाठी ८९१ उमेदवार, अमळनेर ५४३ जागांसाठी ९०२ उमेदवार, चोपडा ४८२ जागांसाठी ८७४ उमेदवार, पाचोरा ८४४ जागांसाठी १६२५ उमेदवार, भडगाव ३०९ जागांसाठी ५४७ उमेदवार, तर चाळीसगाव ७३४ जागांसाठी १३८३ उमेदवार उमेदवार रिंगणात आहेत.
५ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त -
ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया ही निर्भय वातावरणात पार पडावी, त्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने ५ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त जिल्हाभरात करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या 5 तुकड्यांसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस अधिकारी व कर्मचारीदेखील बंदोबस्तासाठी मागवण्यात आले आहेत.
जळगाव तालुक्यात १७० मतदान केंद्र-
जळगाव तालुक्यात १७० मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांची पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. प्रत्येक पथकात ४ पोलिंग ऑफिसर व १ शिपाई अशी रचना करण्यात आलेली आहे. तातडीच्या परिस्थितीत राखीव कर्मचाऱ्यांची पथकेदेखील तयार करण्यात आलेली आहेत. आज प्रत्येक मतदान केंद्रावर इव्हीएम मशिन्स व आवश्यक त्या साहित्यासह पथके रवाना केली आहेत, अशी माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा - समीर खान यांच्या घरावर एनसीबीचे छापे; कायद्यापेक्षा कोणी मोठा नसल्याची मलिकांची प्रतिक्रिया