जळगाव -महापालिका प्रशासनाकडून शहरातील विविध रस्त्यांवर उभारण्यात आलेले दुभाजक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दुभाजक उभारणीत केवळ ठेकेदाराचे हीत जोपासले आहेत. त्यामाध्यमातून सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांनी आर्थिक मलिदा लाटला आहे. चुकीच्या पद्धतीने उभारलेल्या दुभाजकांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या वतीने करण्यात आला आहे. गुरुवारी याच विषयासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेचे अभिप्राय नोंदवले.
जळगाव शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर महापालिका प्रशासनाच्या वतीने दुभाजक उभारण्यात आले आहेत. अनेक रस्त्यांवर गरज नसताना तर काही रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने दुभाजक उभारले आहेत. दुभाजक उभारताना तांत्रिक बाबी पाळल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तांत्रिकदृष्ट्या अयोग्य असलेल्या दुभाजकांमुळे अपघात देखील घडत आहेत. या विषयासंदर्भात नागरिकांकडून तक्रारी होऊ लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलने हा मुद्दा उचलला आहे. शहरातील कोर्ट चौक ते गणेश कॉलनीतील मुख्य चौकापर्यंतच्या रस्त्यावर उभारलेले दुभाजक सर्वाधिक त्रासदायक ठरत आहेत. कारण कोर्ट चौक ते गणेश कॉलनी हा रस्ता शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर शाळा-महाविद्यालये, दवाखाने, बँका, व्यापारी आस्थापना तसेच अनेक कार्यालये आहेत. दिवसभर या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणे देखील मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहतूक कोंडी होते.
हेही वाचा -पाचवीपर्यंतच्या सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद, कोरोनाच्या प्रसारामुळे दिल्ली सरकारचा निर्णय