जळगाव -भुसावळ येथील भाजपचे नगरसेवक रवींद्र बाबुराव खरात उर्फ हंप्या यांच्यासह पाच जणांच्या सामूहिक हत्याकांडाला राजकीय पूर्ववैमनस्याची किनार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. या घटनेला आता राजकीय वळण देण्यात येत आहे. या घटनेमागे खरे सूत्रधार वेगळे असून पोलिसांनी पकडलेले तिघे आरोपी हे केवळ मोहरे आहेत. पोलिसांनी या घटनेचा निःपक्षपातीपणे तपास करून खऱ्या सूत्रधारांना गजाआड करावे, अशी मागणी खरात कुटुंबीयांनी केली आहे.
भुसावळमधील सामूहिक हत्याकांडाला राजकीय पूर्ववैमनस्याची किनार भुसावळ शहरातील गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास सशस्त्रधारी तिघांनी केलेल्या गोळीबारात नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्यासह त्यांचे भाऊ सुनील बाबुराव खरात (५५) मुलगा प्रेमसागर रवींद्र खरात (२४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०) आणि सुमित गजरे (२५) हे पाच जण ठार झाले आहेत. त्याचप्रमाणे खरात यांची पत्नी रजनी खरात, दुसरा मुलगा हितेश याच्यासह अन्य एक असे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर रविवारी मध्यरात्री पाचही मृतांचे मृतदेह जळगावच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर सायंकाळी खरात कुटुंबीयांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, या घटनेमुळे भुसावळ शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
हेही वाचा -भुसावळमध्ये भाजप नगरसेवकाच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला; पाच जणांचा मृत्यू
या घटनेसंदर्भात मृत रवींद्र खरात यांचा मुलगा हंसराज खरात याने दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही हल्लेखोरांनी सुरुवातीला सुनील खरात यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर त्यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार केला. हा आवाज ऐकून रवींद्र खरात घराबाहेर आले असता हल्लेखोरांनी त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला. ही घटना पाहून प्रेमसागर आणि रोहित हे जीव वाचविण्यासाठी घरातून बाहेर पळाले. मात्र, हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावरही शस्त्राने वार तसेच गोळीबार करून ठार केले. या घटनेवेळी दोघांच्या मदतीला धावून आलेल्या सुमित खरातला देखील आपला जीव गमवावा लागला.
मृतांच्या नातेवाईकांना मदतीची मागणी
या घटनेतील मुख्य आरोपींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी रिपाइंचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केली. या भ्याड घटनेच्या निषेधार्थ उद्या रिपाइंने जिल्हा बंदची हाक दिली आहे. दरम्यान, मयत खरात कुटुंबियांच्या अंत्यसंस्कारासाठी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले येणार असल्याचेही अडकमोल यांनी सांगितले. परंतु, या माहितीला प्रशासनाकडून दुजोरा मिळाला नाही.
मृतांच्या नातेवाईकांना मदतीची मागणी खरात कुटुंबीयांची गुन्हेगारी पार्श्वभूमी
दरम्यान, या घटनेत ठार झालेले नगरसेवक रवींद्र खरात आणि त्यांच्या मुलांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले होते. एमपीडीए सारखी कारवाई त्यांच्यावर झालेली आहे. प्रथमदर्शनी टोळी युद्धातून हा प्रकार घडल्याचे दिसून येत असल्याने त्यात अजून कोणाचा समावेश आहे, या प्रकरणाला अजून काही कंगोरे आहेत का, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.