जळगाव -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून मतदारयादीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदारयादीसाठी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या राहिलेल्या ठरावांसाठी १५ ते २० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे अवघ्या चार दिवसांत ठरावांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
या निवडणुकीत मर्यादित मतदार
विविध कार्यकारी साेसायटी ज्या संचालकांच्या नावे ठराव करते, ताे संचालक जिल्हा बँकेसाठी त्या मतदारसंघातून उमेदवारी करणे आणि मतदान करण्यासाठी पात्र असताे. त्यामुळे विविध कार्यकारी साेसायट्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या ठरावांसाठी राजकीय माेर्चेबांधणी महत्त्वाची असते. या निवडणुकीत मर्यादित मतदार असल्याने प्रत्येक ठरावाचे महत्त्व असते.
वर्षभरापूर्वी सुरू झाली होती निवडणूक प्रक्रिया
जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया गेल्या वर्षी सुरू झाली हाेती. त्यामुळे जानेवारी २०२०अखेरपर्यंत बहुतांश विविध कार्यकारी साेसायट्यांनी ठरावाची प्रक्रिया पूर्ण केली हाेती. ठरावांसाठी ५ दिवसांची मुदत बाकी असताना निवडणुकीवर स्थगिती आली हाेती. त्यामुळे आता नव्याने प्रक्रिया करताना आधी राहिलेल्या ५ दिवसांची मुदत देऊन हे ठराव मागितले आहेत. मागील वर्षी ठराव न पाठवू शकलेल्या विविध कार्यकारी साेसायट्यांना ठराव पाठवायचे आहेत. आपल्या मर्जीतील व्यक्तीचा ठराव करावा म्हणून इच्छुक उमेदवार सध्या त्या-त्या गावांमध्ये आहेत. जवळपास २० टक्के ठराव या शनिवारपर्यंत केले जाण्याची शक्यता आहे.
इच्छुकांचे ठरावासाठी प्रयत्न
स्थानिक पातळीवर विविध कार्यकारी साेसायट्यांकडून हाेणारे ठराव मर्जीतील संचालकांचे असावे म्हणून इच्छुक उमेदवारांना ठरावासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. यासाठी माेठा आर्थिक खर्चदेखील येत आहे. या खर्चाचा भार बँकेच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांवर येणार आहे.