जळगाव- राज्याच्या सत्तेत शिवसेना व काँग्रेससोबत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता स्वतंत्ररित्या विस्ताराच्या दिशेने वाटचाल करत आहे. या वाटचालीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्या क्रमांकाचा शत्रू असलेल्या भाजपला लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या 'राष्ट्रवादी परिसंवाद यात्रे'तून याचे प्रत्यक्ष संकेत मिळाले. जळगाव जिल्ह्यात भाजपला बॅकफूटवर ढकलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला एकनाथ खडसेंच्या रुपाने मातब्बर नेत्याला आपल्या गळाला लावले. त्यानंतर आता खडसेंच्या माध्यमातून भुसावळातील 13 नगरसेवकांसह त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन नगरपालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय भूकंप घडवून आणला. जळगाव जिल्हा भाजपसाठी हा मोठा 'सेटबॅक' मानला जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली खेळी ही भाजपच्या अडचणी वाढवणारी असून, जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. दुसरीकडे, भुसावळात अलीकडे घडलेल्या घडामोडी या भाजपच्या चिंता वाढवणाऱ्या असल्या तरी राष्ट्रवादीसाठीही पक्ष नेतृत्त्वाच्या दृष्टीने पक्षांतर्गत आव्हाने निर्माण करणाऱ्या आहेत.
माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केला. खडसेंच्या पक्षत्यागानंतर त्यांचे प्रभाव क्षेत्र असलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपची चांगलीच कसोटी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेनिमित्त या मतदारसंघात अलीकडच्या काळात जोरदार राजकीय घडामोडी घडल्या. या साऱ्या घडामोडी भाजपाची चिंता वाढवणाऱ्या आहेत. भुसावळचे भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या विधानसभा मतदारसंघात महत्त्वपूर्ण मानली जाणारी भुसावळ नगरपालिकेतील भाजपच्या नगराध्यक्षांसह 13 नगरसेवक, त्यांचे कुटुंबीय व समर्थक अशा अर्धशतकी संख्या असलेल्या मंडळीने राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधले. त्यामुळे भाजप पुरता संकटात सापडला आहे. भुसावळ नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत पक्षाला बसलेला झटका हा निश्चितच आगामी निवडणुकीचा स्कोअर कमी करणारा ठरू शकतो. विशेष म्हणजे, भुसावळात भाजपला या झटक्यातून सावरावे तर लागेलच शिवाय राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी सक्षम पर्याय देखील वेळीच उभा करावा लागणार आहे. यासाठी पक्षाकडे फार वेळ नाही. अशा परिस्थितीत भाजपच्या भूमिकेकडे लक्ष असेल. भाजपसाठी दुहेरी संकट-
नगरपालिका निवडणूक तोंडावर असताना घडलेल्या राजकीय घडामोडी भाजपसाठी खूपच अडचणीच्या ठरणार आहेत. पक्षातील डॅमेज कंट्रोल रोखण्याचे आव्हान पेलत असतानाच भाजपला आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. यासाठी भाजपकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. गेल्या साडेचार वर्षांच्या काळात भुसावळ शहरात फारशी विकासाची कामे झालेली नाहीत. अमृत पाणीपुरवठा योजनेसारखी जी कामे मंजूर झाली, ती संथगतीने सुरू आहेत. रस्ते, शुद्ध पाणी, स्वच्छता अशा मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न जैसे थे आहे. याचे भांडवल आता राष्ट्रवादी काँग्रेस निश्चितच करेल. सोबतच नगरपालिका निवडणुकीपूर्वी सक्षम राजकीय मोर्चेबांधणी झाली नाही, तर भाजपला फटका बसण्याची भीती आहेच. एकंदरीतच काय तर भाजपसाठी सध्या 'इकडे आड, तिकडे विहीर' अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
भाजप नेते म्हणतात...
भुसावळात घडलेल्या राजकीय घडामोडींबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना आमदार संजय सावकारे म्हणाले की, आमचे काही नगरसेवक नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी पक्षांतर करताना पळवाट शोधली आहे. त्यांनी पक्षाला प्रत्यक्ष सोडचिठ्ठी दिलेली नाही. मात्र, कुटुंबीय आणि समर्थकांचा त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश घडवून आणला आहे. यामुळे पक्षाला निश्चितच फटका बसेल. पण तो फार काळ नसेल. कुणी पक्ष सोडून गेले म्हणजे पक्ष थांबत नसतो. एक जण गेला की दुसरा येतो. एकाचे काम थांबले की दुसऱ्याला संधी मिळत असते. आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी आम्ही आतापासून मोर्चेबांधणी करू. पक्षातील नव्या लोकांना संधी, जबाबदारी देऊ. गेल्या साडेचार वर्षांच्या काळात शहरात अनेक विकासकामे मंजूर झाली आहे. अनेक योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. ही सारी कामे भाजपच्या कार्यकाळात झाली आहेत, हे जनतेला माहिती आहे. केंद्रात भाजपचे सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे. त्यामुळे जनता भाजपच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहील, असा विश्वास आमदार सावकारे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीचा दावा, भाजपला हद्दपार करू-
याच विषयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून भूमिका मांडताना माजी आमदार संतोष चौधरी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, आता लोकांनीच भाजपला हद्दपार करण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस परिसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्याची प्रचिती आली. भुसावळ नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. पण गेल्या साडेचार वर्षांत शहराचा विकास तर सोडा मात्र, शहर अनेक वर्षे मागे पडले. मूलभूत सुविधा देखील येथील नागरिकांना मिळत नाही, हे दुर्दैव आहे. भाजपतील मुस्कटदाबी सहन करायची नाही म्हणून नगरसेवकांचा एक मोठा गट आमच्याकडे आला आहे. भुसावळ शहराचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही आता प्रयत्नशील राहू. शहराचा विकास राष्ट्रवादीशिवाय होणार नाही, हे जनतेला माहिती झाले आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजपला पिछाडीवर ठेऊ असा विश्वास संतोष चौधरी यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्त्वाचा प्रश्न असेल महत्त्वपूर्ण-
भुसावळात भाजपला घेरण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसची खरी कसोटी आता स्थानिक नेतृत्त्वाच्या मुद्द्यावर असेल. कारण याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी हे मातब्बर नेते आहेत. त्यांचे तालुक्यात मोठे वलय आहे. माजीमंत्री एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असताना चौधरी यांचे प्रमुख विरोधक म्हणून खडसेंचे नाव घेतले जायचे. आता खडसे आणि चौधरी एकाच झेंड्याखाली आहेत. खडसेंना मानणारा मोठा वर्ग रावेर लोकसभा मतदारसंघात आहे. भुसावळ देखील त्याला अपवाद नाही. मग भुसावळ नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कोणाच्या हाती नेतृत्त्वाची सूत्रे देईल? हे पाहणे महत्त्वाचे असेल. खडसेंसोबत आपले वैयक्तिक मतभेद नव्हते. आतापर्यंत आम्ही राजकीय मतभेदांमुळे एकमेकांच्या विरोधात होतो, असे संतोष चौधरी म्हणत असले तरी स्थानिक नेतृत्त्वाच्या मुद्द्यावरून ते खडसेंशी जुळवून घेतील की नाही, हे आताच सांगता येणे कठीण आहे. दुसरीकडे, एकनाथ खडसे हे संतोष चौधरी यांच्यासोबत कसे जुळवून घेतात? हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे असेल. स्थानिक नेतृत्त्वाची सूत्रे चौधरींना दिली तर खडसे आणि त्यांच्या समर्थकांची काय भूमिका असेल? याचीही उत्सुकता आहे. हे सारे प्रश्न उपस्थित होण्यामागे उदाहरण द्यायचे झाले तर जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेचे देता येईल. भुसावळच्या ज्या 13 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांनी भुसावळला झालेल्या कार्यक्रमात नाही तर दुसऱ्या दिवशी जळगावात झालेल्या कार्यक्रमात पक्ष प्रवेश केला. भुसावळला झालेला कार्यक्रम हा माजी आमदार संतोष चौधरींच्या नियोजनातून होता. तर जळगावात झालेला कार्यक्रम हा माजीमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली होता. जर भुसावळच्या नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल व्हायचेच होते तर त्यांनी भुसावळच्या कार्यक्रमात का प्रवेश केला नाही? हा प्रश्नच आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्त्वाचा प्रश्न महत्त्वपूर्ण असेल, असे बोलले जात आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपची वाट बिकट-
खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर घडणाऱ्या राजकीय घडामोडी पाहता रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपची वाट बिकट झाल्याचे दिसून येत आहे. 4 आमदार आणि 2 खासदार भाजपकडे असले तरी माजीमंत्री गिरीश महाजन सोडले तर जिल्ह्यात भाजपकडे दुसरा मोठा चेहरा नाही. माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्या निधनानंतर रावेरमध्ये भाजपकडे प्रबळ नेता नाही. त्यातच खडसे आता स्थानिक नेत्यांना लक्ष्य करत आहेत. अशा परिस्थितीत आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा बँक, दूध संघ अशा निवडणुकांमध्ये भाजपची कसोटी असेल, यात शंका नाही.