जळगाव- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री भडगाव-चाळीसगाव रस्त्यावर पाठलाग करुन अवैध वाहतूक करण्यात येणारा गांजा जप्त केला. या कारवाईत ३ जणांना अटक करण्यात आली आहे. तर ४ साथीदार फरार झाले आहेत. पोलिसांनी तब्बल ७० लाख ७० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
यावेळी ४४ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा गांजा, २६ लाख रुपये किमतीच्या २ अलिशान कार व मोबाईल या कारवाईत जप्त केले. शुभम किरण राणा (वय २२), भूषण केशव पवार (वय ३२ रा. चाळीसगाव) व रवींद्र गुलाबराव शिंदे (वय ५३, भुसावळ) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तिघांविरुध्द चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अमली पदार्थाची तस्करी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईसाठी ठिकठिकाणी नेमले पथक-
अकोला येथून दोन कारमधून चाळीसगाव शहरात गांजा येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना मिळाली होती. त्यानुसार रोहोम यांनी त्यांचे सहकारी रामकृष्ण पाटील व महेश पाटील यांना खात्री करुन पुढील कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
अकोला येथून कार मध्यरात्री दोन वाजेपर्यंत चाळीसगावात पोहचणार असल्याची पक्की माहिती रोहोम यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक निरीक्षक रवींद्र बागुल, महेश जानकर, रामचंद्र बोरसे, संजय सपकाळे, रामकृष्ण पाटील, महेश पाटील, विनयकुमार देसले, रवींद्र भगवान पाटील, किरण चौधरी, दत्तात्रय बडगुजर, योगेश वराडे, अशरफ शेख, इद्रीसखान पठाण यांचे पथक तयार केले होते.