जळगाव - लॉकडाऊनच्या काळात दारूविक्रीला बंदी असताना दारूची अवैधरित्या तस्करी करण्याचा डाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उधळून लावला आहे. सोमवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास जळगावातील अजिंठा चौफुली परिसरातील आरके वाईन शॉपच्या गोदामावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत सुमारे एक लाख रुपयांच्या देशी-विदेशी दारूसह साडेतीन लाख रुपयांची कार असा एकूण साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी वाईन शॉपच्या मालकासह 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरके वाईन शॉपच्या मालकिन दिशांत दिनेश मोटवानी, तिचा पती दिनेश राजकुमार मोटवानी, व्यवस्थापक गणेश कासार, कर्मचारी नितीन श्यामराव महाजन आणि नरेंद्र अशोक भावसार अशी याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या 5 जणांची नावे आहेत. त्यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. कालच हा लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत पुढे वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीला बंदी आहे. मात्र, असे असताना जळगाव शहरात दारूची अवैध विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. अवैध दारूविक्रीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे दारू तस्करी करणाऱ्यांवर लक्ष आहे. दरम्यान, अजिंठा चौफुली परिसरातील आरके वाईन शॉप तसेच गोदामातून रविवारी मध्यरात्रीनंतर तस्करीसाठी देशी आणि विदेशी दारूचा साठा बाहेर काढला जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी अजिंठा चौफुली परिसरात रात्रीपासून सापळा रचला. सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास आरके वाईन शॉपच्या गोदामातून देशी-विदेशी दारू बाहेर काढून ते (एमएच 18 डब्ल्यू 9842)क्रमांकाच्या चारचाकीतून तस्करीसाठी बाहेर नेण्यात येत होते. याचवेळी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सुमारे 1 लाख रुपयांचा दारूसाठा तसेच कार जप्त करण्यात आली.