जळगाव -जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि आता पुणे शहर पोलीस दलात अप्पर आयुक्त असलेले डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बनावट खाते तयार करणाऱ्या व्यक्तीने डॉ. सुपेकर यांच्या नावे पैशांची मागणी देखील केली. सायबर हॅकर्स लोकांना गंडवण्यासाठी नानाविध क्लुप्त्या शोधत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे
मित्रांना पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट -
डॉ.सुपेकर यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने फेसबुक खाते तयार केले, त्यात या व्यक्तीने त्यांच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. या रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली. पुण्यातील व्यापारी असलेल्या मित्राने सुपेकरांना खरच पैशाची गरज असेल म्हणून ५० हजार रुपये ऑनलाईन पाठवले.
जळगावातील मित्रांनी लक्षात आणून दिला प्रकार-
सुपेकर यांच्या नावाने बनावट खाते तयार झाल्याचे जळगावमधील मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ हा प्रकार सुपेकरांना कळविला. सुपेकर यांनी त्याची दखल घेऊन पुण्यातील शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून हे खाते बंद केले.