जळगाव - पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा मृतदेह बुधवारी सकाळी सात वाजता मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या अधिकारी निवासस्थानाच्या मुख्य गेटजवळ आढळून आला. गोपाल रामचंद्र सोनवणे (वय ४५, रा.भुसावळ), असे मृत पोलिसाचे नाव असून अद्याप मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.
जळगावात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, कारण अस्पष्ट - जळगाव लेटेस्ट न्युज
जळगाव मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा आज सकाळी मृत्यू झाला. मात्र, अद्याप मृत्यूचे कारण समजू शकले नाही.
सोनवणे यांची नियुक्ती पोलीस मुख्यालयात होती. मात्र, काही दिवसांपासून ते गैरहजर होते. प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते अधिकारी निवासस्थानाच्या मुख्य गेटजवळ फिरत होते. अचानक ग्लानी येऊन खाली कोसळले आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, पोलीस उपअधिक्षक डॉ. निलाभ रोहन, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचानामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोनवणे यांचे कुटुंबीय भुसावळ येथून जळगावात दाखल झाले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यू कशामुळे झाला? हे स्पष्ट होईल.