जळगाव - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या चार भावंडांच्या हत्याकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेनंतर तब्बल सात दिवसांनी आज (गुरुवारी) दुपारी पोलीस या घटनेच्या तपासाची दिशा, संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीत उलगडलेला घटनाक्रम याबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. पोलिसांनी या घटनेच्या तपासादरम्यान, कोणत्याही प्रकारची माहिती समोर येऊ दिली नाही, त्यामुळे पोलीस तपासबाबत साशंकता व्यक्त केली जात होती.
बोरखेडा हत्याकांड : पोलीस करणार घटनाक्रम आणि तपासाची दिशा स्पष्ट
बोरखेडा येथे घडलेल्या चार भावंडांच्या हत्याकांडाच्या तपासाची दिशा, संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीत उलगडलेला घटनाक्रम याबाबत आज गुरूवारी पोलीस सविस्तर माहिती देणार आहेत.
बोरखेडा येथील एका शेतातील झोपडीवजा घरात 15 ऑक्टोबरला रात्री हे हत्याकांड घडले. त्यानंतर 16 ऑक्टोबरला सकाळी ही घटना समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी या हत्याकांडाच्या चौकशीत आतापर्यंत अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे. परंतु, सखोल चौकशीत या हत्याकांडात चौघांचा समावेश असल्याचे स्पष्ट होत आहे. चारही संशयितांमध्ये तिघे अल्पवयीन असल्याचीही माहिती समोर येत आहे. संशयितांच्या वयाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे पुरावे मिळत नसल्याने पोलिसांनी त्यांच्या हाडांची वैद्यकीय तपासणी करून वय निश्चिती केली. त्यात ते तिघेही अल्पवयीन असल्याचे समजले. तर चौथा संशयित आरोपी हा 22 ते 24 वर्षे वयाचा असल्याचे समोर आले आहे. चौघांनी दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात सांगितले आहे. हे चारही संशयित आरोपी हे हत्या झालेल्या भावंडांच्या मोठ्या भावाचे मित्र आहेत.
दरम्यान, आज पोलीस या हत्याकांडाच्या बाबतीत सविस्तर माहिती देणार आहेत. त्यानंतर संशयितांच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण होईल, असेही सांगितले जात आहे. ताब्यातील संशयित आरोपी हे सातत्याने कबुली जबाब बदलत असल्याने पोलिसांची अडचण होत आहे. म्हणून पोलीस त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीची खात्री करून घेत पुरावे संकलित करत आहेत.