जळगाव - साप्ताहिक सुटीच्या दिवशी आईच्या भेटीसाठी येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज पहाटे जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ घडली. सागर रमजान तडवी (वय 30) , असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सागर तडवी हे यावल तालुक्यातील हंबर्डी येथील रहिवासी आहेत. या अपघातात सागर यांचे सहकारी संतोष बोरसे हे देखील जखमी झाले आहेत.
सागर तडवी हे अगोदर रामानंदनगर पोलीस ठाण्याला कार्यरत होते. त्यानंतर आता ते पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. मुख्यालयात कार्यरत असताना त्यांची काही दिवसांपूर्वी शिर्डी येथे बंदोबस्तासाठी ड्युटी लागली होती. ड्युटीवर असताना साप्ताहिक सुट्टीला आईच्या भेटीसाठी ते (एमएच 19 डीएल 5370) क्रमांकाच्या दुचाकीवरून जळगावात येत होते. यावेळी त्यांच्यासोबत सहकारी संतोष बोरसे होते. दोघेही दुचाकीने शिर्डीहून जळगावला येत होते. पहाटेच्या सुमारास शिरसोली गावापासून पुढे काही अंतरावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेले सागर यांचा जागीच मृत्यू झाला, तर संतोष बोरसे हे गंभीर जखमी झाले.