जळगाव -एमआयडीसीतील प्लास्टिक मोल्डेड फर्निचर बनविणार्या स्वामी पॉलिटेक या कंपनीतून २० लाख ६८ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. अवघ्या ७२ तासात संशयित आरोपी अरविंद अरूण वाघोदे (वय २२) ला अटक केली आहे. पैसे चोरल्यानंतर हातउसनवारीची रक्कम तो चुकवत असताना त्याला पोलिसांनी अटक केली.
जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील गोदडीवाला हौसिंग सोसायटीतील हरिषकुमार मंधान यांच्या मालकीची एमआयडीसीत स्वामी पॉलिटेक कंपनी आहे. या कंपनीच्या ऑफिसमधील एका लाकडी कपाटाचे लॉक तोडून १२ लाख ६८ हजार रुपये तर ड्रॉवरमधून ८ लाख ७४० रुपये अशी एकूण २० लाख ६८ हजार ७४० रुपयांची रोकड अरविंद वाघोदे याने २ ऑक्टोबरला लंपास केली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
डॉग स्कॉडलाही मिळाला नव्हता ठोस पुरावा-
चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली होती. चोरी करताना चोरट्याने मास्क लावले होते. याठिकाणी फॉरेन्सिक लॅबचे पथक व डॉग स्कॉडचे पथक दाखल झाले होते. या पथकाला चोरट्याच्या हाताचे ठसे मिळाले होते. तर डॉग स्कॉटने श्रद्धा पॉलिमरपर्यंत चोरट्याचा मार्ग दाखविला होता. त्यानुसार चोरट्याचा शोध सुरु होता. दरम्यान, हा चोरटा बोदवडजवळील जंगलात लपून बसला असल्याची गोपनीय माहिती पोलीस नाईक इम्रानअली सैय्यद यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना दिल्यानंतर तात्काळ सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, इम्रान सैय्यद, मुदस्सर काझी, सचिन पाटील, सतीश गर्जे यांचे पथक आरोपीला अटक करण्यासाठी रवाना झाले.
अवघ्या ७२ तासात केली अटक-
पैसे चोरल्यानंतर हातउसनवारीची रक्कम तो पटापट चुकवत होता, हीच बाब पोलिसांना खबऱ्याकडून समजल्याने तो जाळ्यात अडकला. आरोपी अरविंद वाघोदे हा जंगलातील विहिरीजवळ असल्याचे समजात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. यावेळी त्याच्याजवळ असलेल्या बॅगची झडती घेतली असता त्याच्याकडून ९ लाख ८ हजार ३०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. दरम्यान, आरोपी अरविंदला अटक करुन त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रतीलाल पवार करीत आहे.