महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' कैद्याच्या मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन; व्हिसेरा राखीव, प्रकरणाची न्यायालयीन चौकशी - जळगाव कैदी चिन्या मृत्यू प्रकरण

जिल्हा कारागृहात चिन्या उर्फ रवींद्र रमेश जगताप याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी चिन्याचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्याची मागणी केली होती. शनिवारी सायंकाळी त्याचे शवविच्छदन करण्यात आले. मृतदेहावर कुठे मारहाणीच्या जखमा, व्रण आहेत का? मृतदेहावर एखाद्या ठिकाणी संशयास्पद खाणाखुणा आहेत का? याची खात्री करण्यात आली. याशिवाय मृतदेहाचा सविस्तर पंचनामा करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला

कैद्याच्या मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन
कैद्याच्या मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन

By

Published : Sep 13, 2020, 10:45 AM IST

जळगाव- येथील जिल्हा कारागृहात संशयास्पद मृत्यू झालेला चिन्या उर्फ रवींद्र रमेश जगताप (वय 35, रा. शिवाजीनगर, जळगाव) या कैद्याच्या मृतदेहावर शनिवारी सायंकाळी 5 वाजता इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे. तर मृत्यूच्या कारणाबाबतचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मतही या प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग म्हणून गोपनीय ठेवण्यात आले आहे. चिन्या याच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे मृतदेहाचे विच्छेदन करण्यापूर्वी न्यायाधीश आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष मृतदेहाची तपासणी करण्यात आली. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू आहे.

कैद्याच्या मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन

शहरातील शिवाजीनगर हुडको भागात 6 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता काही तरुणांचा वाद झाला होता. या वादात एकावर चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चिन्या उर्फ रवींद्र रमेश जगताप याला अटक झाली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्याने तो गेल्या 4 ते 5 दिवसांपासून जिल्हा कारागृहात होता. त्याचा शुक्रवारी दुपारी संशयास्पद मृत्यू झाला होता. चिन्या याच्या मृत्यूमागे काहीतरी घातपात झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. कारागृहात मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे, असा आरोप करत त्याच्या कुटुंबीयांनी मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची विनंती केली होती. याशिवाय जिल्हा कारागृहाचे जेलर जोसेफ पेट्रन यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याचीही मागणी कुटुंबीयांची होती.

हे प्रकरण गंभीर असल्याने चिन्याच्या कुटुंबीयांची मागणी लक्षात घेऊन शनिवारी दुपारी जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात मृतदेहाचे विच्छेदन करण्यापूर्वी न्यायाधीश आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष मृतदेहाची तपासणी करण्यात आली. त्यात मृतदेहावर कुठे मारहाणीच्या जखमा, व्रण आहेत का? मृतदेहावर एखाद्या ठिकाणी संशयास्पद खाणाखुणा आहेत का? याची खात्री करण्यात आली. याशिवाय मृतदेहाचा सविस्तर पंचनामा करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर मृत्यूच्या कारणाबाबतचे मत तपासाधिकाऱ्यांना कळवण्यात येणार आहे.

कुटुंबीयांनी 24 तासांनी घेतला मृतदेह ताब्यात-

चिन्याच्या मृत्यूबाबत शंका असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली होती. तसेच जोपर्यंत जेलर जोसेफ पेट्रन यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, ते निलंबित होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला होता. या मागण्यांसाठी चिन्याच्या कुटुंबीयांनी शनिवारी सकाळपासून जिल्हा रुग्णालयात आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनाला खबरदारी म्हणून जिल्हा रुग्णालयात शीघ्र कृती दलाच्या पथकाला पाचारण करावे लागले होते. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला. त्यानंतर दुपारी चिन्याच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आश्वासन दिले. त्यानंतर म्हणजेच 24 तासांनी कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला.

जिल्हा कारागृहातील हालचाली संशयास्पद-

दरम्यान, या प्रकरणानंतर जिल्हा कारागृहात मोठ्या प्रमाणात संशयास्पद घटना-घडामोडी घडल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी दुपारी जिल्हा कारागृहातील कैद्यांना जालन्याच्या कारागृहात तातडीने हलवण्यात आले आहे. कैद्यांच्या स्थलांतरामागे गर्दीचे कारण दिले जात असले तरी आताच कैद्यांचे हे स्थलांतर झाल्याने संशय व्यक्त केला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेलर जोसेफ पेट्रन यांनी कारागृहातील 8 कैद्यांचे टक्कल केल्याचाही प्रकार आत घडला आहे. हे कैदी पेट्रन यांची तक्रार करणार असल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. या माहितीला कारागृह प्रशासनाकडून दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान, शनिवारी कारागृहात एका कैद्याकडे मोबाईल देखील सापडल्याची माहिती आहे. परंतु, याबाबत पोलिसात किंवा कारागृह प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारची नोंद नाही. कारागृहातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक ही माहिती दडवली गेल्याचा संशय आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details