जळगाव -कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा पेठ पोलीस महामार्गावर गस्त घालत असताना मुंबईहून झारखंडला जाणाऱ्या 3 काळीपिवळी टॅक्सींवर कारवाई करण्यात आली. यावेळी १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात या सर्वांना रवाना करण्यात आले आहे.
लॉकडाऊन : मुंबईतून झारखंडला जाणाऱ्या 3 टॅक्सी जळगावात पकडल्या; 15 जण ताब्यात
आज जिल्हा पेठ पोलीस महामार्गावर गस्त घालत असताना मुंबईहून झारखंडला जाणाऱ्या 3 काळीपिवळी टॅक्सींवर कारवाई करण्यात आली असून त्यातील १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
देशात गेल्या 4 दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. राज्यातही त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यावेळी जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांची गस्त सुरू आहे. दरम्यान, आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बहिणाबाई उद्यानाजवळ मुंबईहून झारखंड येथे जाणाऱ्या मुंबईच्या 3 खासगी टॅक्सींची जिल्हापेठ पोलिसांनी चौकशी केली. त्या टॅक्सी झारखंड येथे जात असल्याचे समजले. त्यामुळे जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी तिन्ही वाहने ताब्यात घेतली. त्यातील १५ जणांची चौकशी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीतीने मुंबई सोडून हे नागरिक झारखंड येथे जात होते. त्यामुळे पोलीस निरीक्षक पटेल यांनी १५ जणांना पकडून त्यांना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी रवाना केले आहे.