महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात अभ्यासाच्या तणावातून भाऊबीजेच्या दिवशी भाऊ-बहिणीने घेतले विष, मुलीचा मृत्यू तर मुलगा अत्यवस्थ - जळगावात भाऊ बहिणीने आत्महत्या प्रयत्न

मुंबईत शिक्षण घेत असलेल्या भाऊ-बहिणींनी अभ्यासाच्या तणावातून आलेल्या नैराश्यामुळे ऐन भाऊबीजेच्या दिवशी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात बहिणीचा मृत्यू झाला तर भाऊ अत्यवस्थ आहे.

jalgaon
संग्रहित छायाचित्र

By

Published : Nov 17, 2020, 6:03 PM IST

जळगाव -मुंबईत शिक्षण घेत असलेल्या भाऊ-बहिणींनी अभ्यासाच्या तणावातून आलेल्या नैराश्यामुळे ऐन भाऊबीजेच्या दिवशी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात बहिणीचा मृत्यू झाला तर भाऊ अत्यवस्थ आहे. १६ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता जळगाव तालुक्यातील भोलाणे येथे ही घटना घडली. अश्विता विजय कोळी (सपकाळे, वय २०) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर तिचा मोठा भाऊ विश्वजीत (वय २२) हा अत्यवस्थ आहे.

अश्विता व विश्वजित त्यांचे वडील हे निवृत्त बसवाहक आहेत. ते सध्या भोलाणे येथे शेती करीत आहेत. अश्विता व विश्वजीत हे दोघे उल्हासनगर (मुंबई) येथे महाविद्यालयात शिक्षण घेत होते. तेथेच वडिलांनी घेऊन दिलेल्या घरात दोघे राहत होते. अश्विता विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाला तर विश्वजीत शेवटच्या वर्षाला होता. लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे महाविद्यालय बंद झाले होते. यानंतर दोघे जण मूळ गावी भोलाणे येथे आलेले होते. दरम्यान, आता महाविद्यालयाचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू होता. या ऑनलाईन पद्धतीमुळे त्यांना अभ्यासात मन लागत नव्हते. अनेक विषयांचे ज्ञान व्यवस्थित मिळत नव्हते. त्यामुळे दोघेजण नैराश्यात आले होते. दरम्यान, १६ रोजी भाऊबीजेच्या दिवशी रात्री १० वाजता दोघांनी राहत्या घरात विषारी औषध घेतल्याने ते अत्यवस्थ झाले. हा प्रकार लक्षात येताच वडिलांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना काही वेळातच अश्विताचा मृत्यू झाला. यानंतर विश्वजीत याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे.

नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न, विश्वजितने दिला जबाब-

अश्विताच्या मृत्यूप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी विश्वजीत याचा जबाब नोंदवला आहे. अभ्यासाच्या तणावातून नैराश्य आले, त्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला. असा जबाब त्याने पोलिसांना दिला आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

गिफ्टमुळे नाराजी झाल्याची चर्चा-

दरम्यान, अश्विता व विश्वजीत यांना दिवाळी, भाऊबीजेच्या निमित्ताने वडिलांकडे चांगले गिफ्ट हवे होते. हे गिफ्ट न मिळाल्यामुळे दोघे प्रचंड नाराज झाले होते. त्यातूनही त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा, अशी चर्चा सुरू आहे. परंतु, या चर्चेला कुणीही दुजोरा दिलेला नाही.

हेही वाचा -जळगावात दोन हायप्रोफाईल जुगार अड्ड्यांवर छापा, 50 जणांना अटक

हेही वाचा -दुचाकी घसरल्याने ट्रकच्या चाकाखाली येऊन पिता-पुत्र ठार; जळगावच्या नेरीजवळ अपघात

ABOUT THE AUTHOR

...view details