जळगाव -तालुक्यातील आसोदा हे गाव ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर आहे. बहिणाबाईंमुळे हे गाव राज्यच नव्हे तर देशाच्या नकाशावर झळकले आहे. परंतु, गावातील ग्रामस्थांना मूलभूत सोयीसुविधादेखील मिळत नसल्याचे चित्र आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ऐन हिवाळ्यात या गावात भीषण पाणीटंचाई भासत आहे. नैसर्गिक जलस्त्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असताना केवळ राजकारण्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे गावात कृत्रिम पाणीटंचाई भासत आहे. सद्यस्थितीत 20 ते 25 दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महिलावर्गाला द्यावे लागते असंख्य अडचणींना तोंड
जळगाव शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आसोदा हे गाव वसलेले आहे. सुमारे 25 ते 30 हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला बहिणाबाई चौधरी यांच्यामुळे विशेष अशी ओळख मिळाली आहे. परंतु, या गावात गेल्या 30 ते 35 वर्षांपासून सातत्याने पाणीटंचाई भासत आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून वार्षिक सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे नैसर्गिक जलस्त्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. असे असताना आसोद्यात ऐन हिवाळ्यात पाणीटंचाई आहे. ग्रामपंचायतीकडून सद्यस्थितीत 20 ते 25 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. कधी कधी तर पाणी योजनेची जलवाहिनी फुटली किंवा विद्युत पंप, इलेक्ट्रिक यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला तर महिनाभर नळांना पाणी येत नाही. अशा वेळी ग्रामस्थांना विशेष करून महिलावर्गाला असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते.
दिवस उजाडला की पाण्याचीच चिंता
आसोद्यातील पाणीटंचाई संदर्भात बोलताना आशा चौधरी म्हणाल्या की, मी लग्न करून या गावात सून म्हणून आले, तशी मला पाण्याची समस्या दिसत आहे. अनेक वर्षे लोटली पण ही समस्या जैसे-थे आहे. दिवस उजाडला की पाण्याचीच चिंता सतावते. नळांना 20 ते 25 दिवस पाणी येत नाही. आता तर चांगला पाऊस पडूनही हिवाळ्यात पाणीटंचाई भासत आहे. पुढे उन्हाळ्यात काय परिस्थिती निर्माण होईल, याचा विचार न केलेला बरा. गावात किमान दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी नळांना पाणी यायला हवे. पण ग्रामपंचायत काहीही उपाययोजना करत नाही. पाण्याअभावी महिलावर्गाची खूप अडचण होते. लहान-लहान मुले, वयोवृद्ध महिला डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती करतात. आसोदा गाव म्हणजे 'नाव मोठं पण लक्षण खोटं' असा प्रकार असल्याची खंत आशा चौधरी यांनी व्यक्त केली.