जळगाव - लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तासह त्याची पत्नी, वडिलांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील तक्रारदार पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी तब्बल २४ तासांनी झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुरेसे मनुष्यबळ नसल्याने हा धक्कादायक प्रकार घडला असून पीडितेला नाहक मन:स्ताप सहन करावा लागला.
लग्नाचे आमिष दाखवत समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील याने सामाजिक न्याय विभागात बार्टी प्रकल्पात कंत्राटी पद्धतीने नोकरीस असलेल्या एका ३० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी सोमवारी पहाटे २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल २४ तासांनी म्हणजेच मंगळवारी दुपारी ३ वाजता पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गुन्हा दाखल केल्यानंतर पीडित तरूणी पोलीस ठाण्यातून मेडिकल मेमो घेऊन सोमवारी पहाटे ३ वाजता वैद्यकीय महाविद्यालयात आली होती. यानंतर लागलीच वैद्यकीय तपासणी करणे अपेक्षित होते. परंतु, तरुणीस सोमवारी दिवसभर रुग्णालयात दाखल करुन ठेवण्यात आले. पुरेसे मनुष्यबळ, तज्ज्ञ डॉक्टर गैरहजर असल्यामुळे सोमवारी तिची वैद्यकीय तपासणी होऊ शकली नाही. त्यामुळे तिला सोमवारची रात्र देखील रुग्णालयातच काढावी लागली.