जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे हे तीन महिन्यांपूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले आहेत. मात्र, त्यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना फारसा रुचलेला नसल्याचे चित्र आहे. हीच बाब अधोरेखित करणारा एक प्रकार गुरुवारी रात्री समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री गुलाबराव देवकर यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी पक्षाच्या जिल्हा कार्यालयाबाहेर लावलेल्या बॅनरवरून चक्क एकनाथ खडसे यांच्या फोटोला स्थान देण्यात आलेले नाही. याच विषयावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यभर दौरा करत आहेत. याच अनुषंगाने, ते गुरुवारी जिल्ह्यात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी माजीमंत्री गुलाबराव देवकर यांनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयाबाहेर भलेमोठे बॅनर लावले. या बॅनरवर एकनाथ खडसे यांचा फोटो मात्र, वगळण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याची एकच चर्चा सुरू झाली. या साऱ्या घडामोडींमुळे खडसे समर्थक नाराज झाल्याचे बोलले जात आहे.
खडसे समर्थकांनी लावलेल्या बॅनरवर मात्र खडसेंचा फोटो..