महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात इंधन दराचा भडका, पेट्रोल ९३ तर डिझेल ८२.०६ रुपये प्रतिलिटर - जळगाव जिल्हा बातमी

जळगावात गुरुवारी (दि.२१ जाने.) पेट्रोलचे दर ९३ रुपये तर डिझेलचे दर ८२.०६ रुपये प्रतिलिटर असे होते. यामुळे येथील नागरिक संतप्त झाले असून सायकली चालवाव्या लागतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

पेट्रोल पंप
पेट्रोल पंप

By

Published : Jan 21, 2021, 3:27 PM IST

Updated : Jan 21, 2021, 5:29 PM IST

जळगाव -आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने स्थानिक बाजारपेठेत पेट्रोल व डिझेलचे दर पुन्हा एकदा भडकले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. जळगावात गुरुवारी (दि.२१ जाने.) पेट्रोलचे दर ९३ रुपये तर डिझेलचे दर ८२.०६ रुपये प्रतिलिटर असे होते. दरम्यान, पेट्रोल व डिझेल या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक बाबी आहेत. त्यांचे दर सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

बोलताना नागरिक

अलीकडच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने महागाईत भर पडत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. जळगावात गेल्या आठ दिवसांत पेट्रोलचे दर दीड रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे पेट्रोलच्या दरांनी नव्वदीचा टप्पा ओलांडला आहे. डिझेलचेही दर सातत्याने वाढतच आहेत. पेट्रोल शंभराच्या तर डिझेल नव्वदीच्या दिशेने वाटचाल करत आहे. इंधनाचे दर वाढल्यानंतर इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही मोठी वाढ होते. त्यामुळे महागाईचा आलेख वाढत जातो. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांनी जगायचे तरी कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आता केंद्र सरकारला महागाई दिसत नाही का?

पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. यापूर्वी पेट्रोलचे दर ६० ते ७० रुपये लिटर असताना आताच्या सत्ताधारी भाजपकडून महागाईच्या नावाने आकांडतांडव केले जात होते. आता पेट्रोल दर शंभराच्या तर डिझेलचे दर नव्वदीच्या दिशेने वाटचाल करत असताना केंद्र सरकारला महागाई दिसत नाही का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

आता वाहने नाही तर सायकली चालवाव्या लागतील

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांबाबत बोलताना सर्वसामान्य लोकांनी ईटीव्ही भारतशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत असल्याने आता वाहने चालवणे परवडत नाही. इंधनाचे दर असेच वाढत राहिले तर आता वाहने नाही तर सायकली चालवाव्या लागतील, असेही काही ग्राहकांनी सांगितले.

Last Updated : Jan 21, 2021, 5:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details