जळगाव - कोविड रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा, असुविधा तसेच डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची बेफिकिरी आणि गैरव्यवहार याच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांच्यासह तिघांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच दोन आठवड्यात याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्यांवर खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
जळगावातील सामाजिक कार्यकर्त्या तथा लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे आणि अन्य दोन जणांनी जळगावातील कोरोनाचा वाढता संसर्ग, आरोग्य यंत्रणेची बेफिकिरी, कोविड रुग्णालयातील अनागोंदी याबाबत थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील गायत्री सिंह व त्यांचे सहकारी वकिल अंकित कुलकर्णी उपस्थित होते. या याचिकेद्वारे सिव्हिल हॉस्पिटल व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन व कर्मचाऱ्यांनी कोविड रुग्णांच्या बाबतीत दाखवलेला हलगर्जीपणा, उणीवा, दुर्लक्ष आणि गैरव्यवहाराबाबत मुद्दे उपस्थित केले आहेत. विशेषत: तत्कालीन अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या कारकिर्दीत 2 जून रोजी सिव्हिल हॉस्पिटलमधून बेपत्ता झालेल्या 82 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू, 10 जून रोजी जिल्हा रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 7 मधील शौचालयात 8 दिवसानंतर तिचा मृतदेह सापडणे, याकडे लक्ष वेधत आहे.