महाराष्ट्र

maharashtra

दोन वर्षांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर सुवर्णनगरी गजबजली! सोने खरेदीसाठी जळगावातील ग्राहकांची गर्दी

जळगावची ओळख सुवर्णनगरी म्हणून आहे. दसर्‍याच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानली जाते. म्हणून अनेक ग्राहक हा मुहूर्त साधून सोने खरेदी करण्यासाठी सराफी पेढ्यांमध्ये गर्दी करत आहेत.

By

Published : Oct 15, 2021, 5:25 PM IST

Published : Oct 15, 2021, 5:25 PM IST

सोने खरेदीसाठी जळगावातील ग्राहकांची गर्दी
सोने खरेदीसाठी जळगावातील ग्राहकांची गर्दी

जळगाव :साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जाणारा विजयादशमी म्हणजेच दसरा सणामुळे जळगावातील सुवर्ण बाजारात चैतन्य संचारले आहे. सोन्याच्या वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांमुळे जळगावची ओळख सुवर्णनगरी म्हणून आहे. दसर्‍याच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानली जाते. म्हणून अनेक ग्राहक हा मुहूर्त साधून सोने खरेदी करण्यासाठी सराफी पेढ्यांमध्ये गर्दी करत आहेत. यावर्षी जडावाचे पेंडल, आकर्षक कुवेती ज्वेलरी सराफा दुकानांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी सराफी पेढी चालकांकडून विविध योजनांचा वर्षाव केला जात आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी प्रथमच सुवर्ण बाजारात उलाढाल वाढली असून, सराफ व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोने खरेदीसाठी जळगावातील ग्राहकांची गर्दी

दसऱ्यासाठी दागिन्यांची खास सिरीज उपलब्ध-
जडावाचे पेंडल सेट (कलेक्शन) हा दागिना कुंदन, लाख, मीना, मोती, डायमंड, क्रिस्टल आदी स्टोनपासून बनणारा खास दागिना दसर्‍यानिमित्त बाजारात आला आहे. 22 व 24 कॅरेट सोने व स्टोनचा सुरेख मिलाफ करून दागिना घडतो. हा दागिना दोन तोळ्यापासून पाच तोळ्यापर्यंतच्या वजनात उपलब्ध आहे. त्यासोबतच विविध सुवर्णपेढींनी कुवेती ज्वेलरीची मोठी रेंज ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यात नेकलेस, बांगड्या, अंगठ्या, पेंडलसेट, चेन, हार, कडे यांचा अगदी पाच ग्रॅमपासून ते 50 ग्रॅम वजनी दागिन्यांच्या दीडशेहून अधिक डिझाईन उपलब्ध आहेत. त्याच सोबतच ग्राहकाने स्वत: आणलेल्या किंवा पसंत केलेल्या आकर्षक डिझाईनप्रमाणे हुबेहुब दागिना बनवून देण्याची सुविधाही अनेक पेढ्यांमध्ये उपलब्ध आहे. पितृपक्षानंतर येणार्‍या नवरात्रोत्सवाला लागून दसरा हा सण येतो. दसर्‍याचा सण सोने-चांदी खरेदीसाठी शुभ मानला जातो. दसर्‍याला नवीन वास्तू, वाहन, सोने व चांदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, नवीन कपडे खरेदीचा मुहूर्त साधला जातो. दसर्‍यामुळे बाजारपेठ फुलली आहे.

आपट्याच्या आकाराच्या सोन्याच्या पानांना खास मागणी-
दसर्‍यानिमित्त अनेक सराफी पेढ्यांनी आपट्याच्या आकाराच्या सोन्याची पाने विक्रीसाठी ठेवली आहेत. ही सोन्याची पाने अर्धा ग्रॅम ते दोन ग्रॅम वजनात उपलब्ध आहेत. जळगाव सुवर्ण बाजाराचे हे प्रमुख वैशिष्ट मानले जाते. काही ग्राहक सोन्याची ही पाने खरेदी करून आपल्या आप्तस्वकियांना देतात. तर काही नागरिक दसर्‍याच्या मुहूर्तावर केलेली शुभ खरेदी म्हणून ही सोन्याची पाने घरात ठेवतात.

कोरोनानंतर हळूहळू सावरतोय सुवर्ण बाजार-
जळगावातील प्रसिद्ध बाफना ज्वेलर्सचे संचालक पप्पू बाफना म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्याने त्याचा विपरित परिणाम सुवर्ण बाजारावर झाला होता. सुवर्ण बाजाराची उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली होती. यातून सराफ व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचा फटका सहन करावा लागला. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सुवर्ण बाजार हळूहळू पूर्वपदावर येत आहे. नवरात्रीपासून सुवर्ण बाजारातील व्यवहारांना गती येऊ लागली आहे. आता दसरा सणासाठी ग्राहक सोने खरेदीला पसंती देत असून, दिवाळीच्या काळात सुवर्ण बाजाराची घडी पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा सराफ व्यावसायिकांना असल्याचे बाफना म्हणाले.

सोने व चांदीचे दर कमी झाल्याने दिलासा-
जागतिक बाजारपेठ अस्थिर आहे. त्यामुळे सोने व चांदी या धातूंचे दर सातत्याने कमी-जास्त होत आहेत. सद्यस्थितीत सोने व चांदीचे दर काही प्रमाणात कमी झाल्याने ग्राहक खरेदीसाठी पुढे येत आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने व चांदी खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या बजेटनुसार सोने-चांदी खरेदी करत आहे. त्यामुळेच जळगावातील सुवर्ण बाजाराची घडी हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा -जळगाव: सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या, आजचे दर

ABOUT THE AUTHOR

...view details