जळगाव -आकाशगंगेत आज (सोमवारी) सायंकाळी एक अद्भुत खगोलीय घटना घडली. सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह गुरू आणि शनी हे एकमेकांच्या अगदी जवळ आलेले होते. खगोलीय भाषेत या घटनेला 'ग्रेट जंक्शन' म्हटले जाते. सुमारे 400 वर्षांनंतर ही दुर्मीळ खगोलीय घटना घडली. ही विलक्षण घटना जळगावकर नागरिकांनी परावर्तित दुर्बिणीच्या माध्यमातून आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली.
जळगावकरांनी पाहिली गुरू व शनी ग्रहाची महायुती; अद्भुत खगोलीय घटनेचे झाले साक्षीदार - जळगाव खगोलीय घटना
आकाशगंगेत आज (सोमवारी) सायंकाळी एक अद्भुत खगोलीय घटना घडली. सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह गुरू आणि शनी हे एकमेकांच्या अगदी जवळ आलेले होते. खगोलीय भाषेत या घटनेला 'ग्रेट जंक्शन' म्हटले जाते.
शहरातील केसीई सोसायटीच्या मूळजी जेठा महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या छतावर, जळगाव खगोलप्रेमी ग्रुप आणि मू. जे. महाविद्यालयातील भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरू व शनी ग्रहांची महायुती अर्थात 'ग्रेट जंक्शन'ची घटना परावर्तित दुर्बिणीच्या माध्यमातून पाहण्याची खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. याठिकाणी शहरातील नागरिकांनी गुरू व शनी ग्रहांची महायुती पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. जळगाव खगोलप्रेमी ग्रुप आणि मू. जे. महाविद्यालयातील भूगोल विभागातील प्राध्यापकांनी नागरिकांना या घटनेचे महत्त्व सांगितले. सायंकाळी साडेसहा वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू होता.
उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद-
या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. प्रत्येक जण परावर्तित दुर्बिणीच्या माध्यमातून गुरू व शनी ग्रहांची महायुती मोठ्या कुतूहलाने पाहत होता. यावेळी बच्चे कंपनीला आकाशगंगेतील या अद्भुत घटनेविषयी विशेष आकर्षण असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, खगोलीय घटनेबाबत माहिती देणाऱ्या या उपक्रमाला प्रसार माध्यमातून चांगली प्रसिद्धी मिळाल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचा विशेष आनंद असल्याचे जळगाव खगोलप्रेमी ग्रुपचे अमोघ जोशी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.