जळगाव -राज्य सरकारने पाडव्यापासून धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. परंतु, कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लोकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. गुलाबराव पाटील हे दिवाळीसाठी पाळधी गावी आपल्या निवासस्थानी होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
गुलाबराव पाटील यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे मंदिरे तसेच सर्व प्रकारची धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली. त्यानंतर राज्यभरातील मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर मंदिरे तसेच धार्मिक स्थळे उघडण्यात येतील, असे सांगितले होते. कोरोनाचा संसर्ग आता काही प्रमाणात आटोक्यात येत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या महाराष्ट्रासह देशभरात कमी होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाडव्यापासून मंदिरे, धार्मिक स्थळे उघडण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. भक्तगणांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.