जळगाव - कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल आणि रावेर तालुक्याचा काही भाग हा सातपुडा पर्वताच्या डोंगराळ प्रदेशात मोडतो. याठिकाणी आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. कोरोनाचा फटका आदिवासींना देखील सहन करावा लागत आहे. हातात काम नसल्याने आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोनामुळे बाढली बेरोजगारी.. सातपुड्यातील आदिवासींवर उपासमारीची वेळ - सातपुडा पर्वत
सातपुडा पट्ट्यातून दररोज शेकडो आदिवासी बांधव आजूबाजूच्या मोठ्या गावांमध्ये तसेच शहरी भागात कामासाठी येत असतात. परंतु, कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी असल्याने त्यांना काम मिळणे कठीण झाले आहे. हाताला कामच नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील यावल आणि रावेर या दोन्ही तालुक्यातील बराचसा प्रदेश सातपुडा पट्ट्यात असणाऱ्या दुर्गम भागात येतो. येथील विविध वाड्या-वस्त्या तसेच पाड्यांवर गटागटाने आदिवासी वास्तव्य करतात. कोरोनामुळे आदिवासींच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. सातपुडा पट्ट्यातून दररोज शेकडो आदिवासी बांधव आजूबाजूच्या मोठ्या गावांमध्ये तसेच शहरी भागात कामासाठी येत असतात. परंतु, कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी असल्याने त्यांना काम मिळणे कठीण झाले आहे. हाताला कामच नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनासह सेवाभावी संस्था व संघटनांकडून होणारी जीवनावश्यक वस्तूंची तुटपुंजी मदत एवढाच काय तो त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे. प्रशासन, सेवाभावी संस्थांकडून मिळणारी जीवनावश्यक वस्तूंची मदत घेताना सोशल डिस्टन्सिंग आदिवासी पाळत आहेत. अनेक पाड्यांवर तर आरोग्याच्या सुविधाही मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.
आदिवासी स्वतः घेताहेत खबरदारी-कोरोना हा जीवघेणा संसर्गजन्य आजार आहे, याची कल्पना आदिवासींना देखील आहे. त्यामुळे आदिवासी स्वतः आपल्या पाड्यांवर आदिवासी बोलीभाषेतील गीतांमधून जनजागृती करत आहेत. कोरोना आजार होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी, एकमेकांपासून सुरक्षित अंतर कसे राखावे, याबाबत गीतांमधून ठिकठिकाणी जनजागृती केली जात आहे. विशेष म्हणजे, अशिक्षित असलेल्या आदिवासींकडून स्वतःहून खबरदारी पाळली जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, जिल्हा प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या सूचनांचे पालनही ते करत आहेत. सातपुड्यातील अनेक पाड्यांवर आदिवासींनी बाहेरच्या लोकांना प्रवेशबंदी केली आहे.