जळगाव - शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. ईदनिमित्त मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण केले. नमाज अदा केल्यानंतर देश हितासाठी दुवा देखील करण्यात आली.
शहरातील मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदानावर एकत्र येऊन ईदनिमित्त नमाज पठण केले. नमाज अदा केल्यावर मौलाना उस्मान साहब यांनी दुवा पठण केले. सर्वधर्मसमभाव जोपासणाऱ्या भारत देशात परस्परातील बंधुभाव वाढीस लागावा, देशात शांतता नांदावी, सर्वच क्षेत्रात देशाची प्रगती व्हावी, त्याचप्रमाणे बळीराजा आणि कष्टकऱ्यांचे जीवनमान उंचावे, भरपूर पर्जन्यमान व्हावे, अशी दुवा यावेळी मागण्यात आली. नमाज पठण झाल्यानंतर ईदगाह मैदानावर उपस्थित असलेल्या मुस्लीम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा प्रदान केल्या.