महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आयएमए'च्या बंदमुळे जळगावातील रुग्णालयांच्या ओपीडी बंद, रुग्ण सेवेवर परिणाम - OPD closed in Jalgaon

'सीसीआयएम'ने (सेंट्रल काउंसील ऑफ इंडियन मेडिसिन) आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेतल्यानंतर 58 प्रकारच्या ऍलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याचा निर्णय अधिसूचनेद्वारे नुकताच घेतला आहे. या निर्णयाचा आयएमएच्या जळगाव शाखेकडून निषेध करण्यात आला आहे.

Patient service collapsed
'आयएमए'चा बंद

By

Published : Dec 11, 2020, 4:03 PM IST

जळगाव - 'सीसीआयएम'ने (सेंट्रल काउंसील ऑफ इंडियन मेडिसिन) आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेतल्यानंतर 58 प्रकारच्या ऍलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याचा निर्णय अधिसूचनेद्वारे नुकताच घेतला आहे. या निर्णयाविरुद्ध वैद्यकीय क्षेत्रातील प्रमुख संघटना असलेल्या 'आयएमए'ने आज (शुक्रवारी) देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला आयएमएच्या जळगाव शाखेने पाठिंबा दिला असून, बंदमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. आयएमएच्या बंदमुळे जळगावातील दवाखाने अत्यावश्यक सेवा वगळता बंद आहेत. या बंदमुळे जळगावातील रुग्ण सेवेवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, आयएमएच्या बंदची माहिती नसल्याने अनेक रुग्णांना तपासणी न करताच माघारी परतावे लागले.

सीसीआयएमच्या अधिसूचनेत बीएएमएस झालेल्या आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणात 58 ऍलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सीसीआयएमने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात आयएमएने आज देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी आयएमएच्या जळगाव जिल्हा शाखेने जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्यात आल्या आहेत.

'आयएमए'चा बंद

बंदमध्ये विविध वैद्यकीय संघटनांचा सहभाग

आयएमएने पुकारलेल्या या बंदमध्ये महाराष्ट्रातील 219 शाखांमधील 45 हजार डॉक्टरांसह महाराष्ट्र मेडिकल काउंसीलमध्ये नोंदणी केलेले 1 लाख 10 हजार डॉक्टर सहभागी झाले आहेत. याशिवाय मेडिकल स्टूडंटस नेटवर्क या आएमएच्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या शाखेतर्फे एमबीबीएसचे शिक्षण घेणारे महाराष्ट्रातील 36 सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील 15 हजार वैद्यकीय विद्यार्थी या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातील खासगी आणि सरकारी महाविद्यालयात आणि अनेक नामांकित इस्पितळात पदव्युत्तर शिक्षण घेणारे 15 हजार ज्युनियर डॉक्टर्स, महाराष्ट्र रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन आणि आयएमएच्या ज्युनियर डॉक्टर नेटवर्कने देखील आंदोलनात सहभाग घेतला आहे. तसेच आधुनिक वैद्यकशास्त्रातील स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या 34 संस्थांनी देखील या बंदला पाठिंबा दिला आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसह देशभरातील सहा लाख आयएमए सदस्य या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातील दीड लाख डॉक्टर्स आणि पदवीपूर्व तसेच पदव्युत्तर विद्यार्थी बंदमध्ये सहभागी आहेत.

या आहेत 'आयएमए'च्या मागण्या-

'सीसीआयएम'ने अधिसूचना त्वरित मागे घ्यावी

राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेकडून तयार करण्यात आलेल्या चार समित्या तातडीने रद्द कराव्यात

वैद्यकीय शाखांची सरमिसळ करण्याऐवजी प्रत्येक शाखेचा वेगळा विकास करून, जनतेला त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा होईल यावर सरकारने भर द्यावा

हा तर रुग्णांच्या जीवाशी खेळ - डॉ. स्नेहल फेगडे

आयएमएच्या आंदोलनाबाबत बोलताना आयएमएच्या जळगाव शाखेचे सचिव डॉ. स्नेहल फेगडे म्हणाले की, 'सीसीआयएम'ने (सेंट्रल काउंसिल ऑफ इंडियन मेडिसिन) आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेतल्यानंतर 58 प्रकारच्या ऍलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा आयएमएच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो. कारण सीसीआयएमने आयुर्वेदिकच्या विद्यार्थ्यांना मागच्या दाराने शस्त्रक्रियेसाठी परवानगी देणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. हा निर्णय त्वरित मागे घेतला पाहिजे. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही डॉ. फेगडे यांनी यावेळी दिला. आंदोलनात आयएमएच्या जळगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांसह डॉक्टरांनी सहभाग घेत निदर्शने केली.

ABOUT THE AUTHOR

...view details