महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोविड रुग्णालयाचा हलगर्जीपणा बेतला रुग्णाच्या जीवावर; संतप्त नातेवाईकांचा अंत्यसंस्कारासाठी नकार - जळगाव कोविड रुग्णालयाचा भोंगळ कारभार बातमी

जळगाव कोविड रुग्णालयातील अनागोंदी कारभारामुळे मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास एका 65 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह वृद्धाचा नाहक बळी गेला. या घटनेनंतर मृत वृद्धाच्या नातेवाईकांनी कोविड रुग्णालयाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त करत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येण्यास नकार दिला. त्यामुळे कोविड रुग्णालयात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

कोविड रुग्णालयातील अनागोंदी बेतली कोरोना रुग्णाच्या जीवावर
कोविड रुग्णालयातील अनागोंदी बेतली कोरोना रुग्णाच्या जीवावर

By

Published : Aug 11, 2020, 10:21 PM IST

जळगाव : येथील कोविड रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कोविड रुग्णालयातील अनागोंदी कारभारामुळे मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास एका 65 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह वृद्धाचा नाहक बळी गेला. 12 दिवसांपूर्वी अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेल्या या वृद्धाची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलवणे गरजेचे होते. डॉक्टरांनी तशा सूचना देखील सहाय्यकांना केल्या होत्या. मात्र, एकमेकांमध्ये असलेल्या 'कम्युनिकेशन गॅप'मुळे वृद्धावर जनरल वॉर्डातच उपचार सुरू राहिल्याने अखेर वृद्धाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत वृद्धाच्या नातेवाईकांनी कोविड रुग्णालयाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त करत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येण्यास नकार दिला. त्यामुळे कोविड रुग्णालयात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

जळगाव शहरातील शिवाजीनगर भागातील एका 65 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 12 दिवसांपासून त्यांच्यावर कोविड रुग्णालयात जनरल वॉर्डात उपचार सुरू होते. रुग्णालयात दाखल करतेवेळीच त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आधीपासून ऑक्सिजनची सुविधा पुरविण्यात आली होती. दरम्यान, 12 दिवसांच्या काळात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांच्या प्रकृतीत कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नव्हती. त्यांचे नातेवाईक या संदर्भात वेळोवेळी कोविड रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपर्कात होते. सुरुवातीला डॉक्टर्स वृद्धाच्या प्रकृतीविषयी माहिती देत होते. परंतु, नंतर डॉक्टरांनी माहिती देणे बंद केले. 3 दिवसांपूर्वी डॉक्टरांनी वृद्धाच्या नातेवाईकांना फोनवरून त्यांची प्रकृती खालावली असून, त्यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलविण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेऊनही वृद्धाच्या प्रकृतीविषयी माहिती मिळाली नाही. वृद्धावर जनरल वॉर्डात उपचार सुरू आहेत की अतिदक्षता वॉर्डात, याचीही माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळाली नाही. सलग 2 दिवस प्रयत्न करुनही वृद्धाच्या नातेवाईकांना त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळाली नाही. त्यानंतर मंगळवारी रात्री कोविड रुग्णालयातून नातेवाईकांना थेट वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे वृद्धाच्या नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली.

'पेशंट शिफ्टिंग'साठी डॉक्टरांनी सूचना केल्या पण सहाय्यकांचे दुर्लक्ष -

3 दिवसांपूर्वी वृद्धाची प्रकृती खालावली होती. त्यावेळी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना जनरल वॉर्डातून आयसीयूत शिफ्ट करण्याच्या सूचना आपल्या सहाय्यकांना दिल्या होत्या. परंतु, एकमेकांच्या कम्युनिकेशन गॅपमुळे वृद्धाला आयसीयूत शिफ्ट करण्यात आले नाही. धक्कादायक बाब म्हणजे, वृद्धाला आयसीयूत शिफ्ट केले किंवा नाही, याची पडताळणी डॉक्टरांनीदेखील केली नाही. त्यानंतर थेट वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतरच ही बाब उघड झाली. तर, रुग्णालयातील हलगर्जीपणा समोर आल्यानंतर एकमेकांकडे बोट दाखवण्यास सुरुवात झाली. कुणीही या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नव्हते.

वृद्धाचे नातेवाईक संताप करत असताना रुग्णालय प्रशासनाने आयसीयूत खाट शिल्लक नसल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. मात्र, 3 दिवसांपूर्वी रुग्णालयातून वृद्धाला आयसीयूत हलविण्यात येत आहे. त्यांच्यासाठी खाट असल्याचे सांगण्यात आले होते. मग, ही घटना घडलीच कशी, असा प्रश्न करत मृत वृद्धाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. जोपर्यंत या प्रकरणाचा सविस्तर खुलासा होत नाही, तोपर्यंत रुग्णालयातून हलणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने रुग्णालयात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या घटनेसंदर्भात कोविड रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

नातेवाईकांचा संताप, अंत्यसंस्कारासाठी नकार -

ही घटना घडल्यानंतर वृद्धाच्या नातेवाईकांनी कोविड रुग्णालयात प्रचंड संताप व्यक्त केला. वृद्धाची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना आयसीयूत हलवणे गरजेचे असताना हलगर्जीपणा करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, वृद्धाच्या प्रकृतीविषयी माहिती विचारूनदेखील रुग्णालयातील डॉक्टर्स माहिती देत नव्हते. वृद्धाची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर वेळीच माहिती मिळाली असती तर त्यांना खासगी रुग्णालयात हलवले असते, असा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला. या प्रकरणी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी समोर यावे, खुलासा करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली. पण डॉ. रामानंद यांनी कोणाचेही फोन घेतले नाहीत. त्यामुळे नातेवाईक अधिक आक्रमक झाले होते. त्यांनी रुग्णालयातील डॉक्टर्स, अधिष्ठाता यांना शिव्यांची लाखोली वाहिली. दरम्यान, रुग्णालयात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला होता. त्यामुळेदेखील मृत वृद्धाचे नातेवाईक संतप्त झाले होते. पोलीस आमच्यावर दबाव आणत असल्याचा आरोपही यावेळी नातेवाईकांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details