जळगाव- जेव्हा काँग्रेसला पर्याय नव्हता, तोपर्यंत ते शांत होते. मात्र, जेव्हा काँग्रेसला सक्षम पर्याय म्हणून भाजप आली. तेव्हा काँग्रेसने भाजपवर अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे, ही मूठभर लोकांची पार्टी आहे, असे सांगत अल्पसंख्याकांना घाबरवून दूर ठेवण्याचे काम काँग्रेसने केले. त्यामुळे काँग्रेस अल्पसंख्यांकांना घाबरवत असल्याची टीका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ जळगाव शहरातील मेहरून परिसरात आयोजित सभेत मुंडे बोलत होत्या.
पंकजा मुंडेंचा काँग्रेसवर हल्लाबोल पंकजा मुंडे यांनी यावेळी आपल्या भाषणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. मोदी सरकारच्या गेल्या साडेचार वर्षातील कामगिरीची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली. त्या पुढे म्हणाल्या की, काँग्रेसकडून आताही अल्पसंख्याकांना घाबरून ठेवण्याचे काम सुरू आहे. अल्पसंख्याकांना घाबरवत असताना काँग्रेसने त्यांना सांगितले, की आम्ही देशद्रोहाचे कलम काढून टाकू, या देशात देशद्रोहाला कुठलीही शिक्षा नसेल तर आतंक माजेल, असेही त्यांनी सांगितले.
या भ्रष्टाचारी सरकारला कंटाळूनच जनतेने त्यांना सत्तेतून बाहेर काढले आहे. तेच आता आम्हाला म्हणतात, की तुम्ही काय केले. जे ७० वर्षात तुम्हाला जमले नाही, ते आम्ही साडेचार वर्षात करून दाखवले आहे. यांचे खरकटे काढण्यातच आमचे दिवस गेले. ७० वर्षात खाऊन खाऊन जे खरकटे यांनी केले होते, ते काढण्यात आमची क्षमता वाया गेली, असेही मुंडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उमेदवार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, विधानपरिषदेचे आमदार चंदूलाल पटेल, महापौर सीमा भोळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, ललित कोल्हे, शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे आदी उपस्थित होते.