जळगाव - आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातील भाविकांसाठी भुसावळ रेल्वे जंक्शनवरून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ही रेल्वे हजारो भाविकांना घेऊन पंढरपूरकडे रवाना झाली.
आषाढीसाठी भुसावळहून पंढरपूरला विशेष रेल्वे रवाना; हजारो भाविकांची झाली सोय - विठु
जिल्ह्यातील हजारो भाविक दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. प्रत्येकाला बसचे महागडे भाडे खर्च करून पंढरपूरला जाणे शक्य नसते.
जिल्ह्यातील हजारो भाविक दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. प्रत्येकाला बसचे महागडे भाडे खर्च करून पंढरपूरला जाणे शक्य नसते. ही बाब लक्षात घेऊन रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी पंढरपूरसाठी एक विशेष रेल्वे सोडण्यात यावी, यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला यश आल्याने गुरुवारी सकाळी भुसावळ रेल्वे जंक्शनवरून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली. या रेल्वेमुळे हजारो भाविकांना आषाढी एकादशीला विठुरायाचे दर्शन लाभणार आहे.
या विशेष रेल्वेला खासदार रक्षा खडसे, मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती, भुसावळचे आमदार संजय सावकारे, जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकुमार महाजन आदींच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखविण्यात आली. ही रेल्वे शुक्रवारी, दुपारी पंढरपूरहून पुन्हा भाविकांना घेऊन भुसावळकडे परतीच्या प्रवासाला निघणार आहे.