जळगाव - शरीराला जडलेली व्याधी, वेदना कायमची दूर व्हावी, असे प्रत्येक रुग्णाला वाटते. अनेकदा ताे जेथे वैद्यकीय उपचार घेताे तेथील वातावरण कसे आहे? यावरही रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ठरते. हीच बाब लक्षात घेऊन कुंचल्यांच्या फटकाऱ्यांतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भिंती, झाडांवर निसर्ग, इन्स्टाॅलेशन, वारली चित्रे रेखाटली जाताहेत. अर्थात, रुग्णांच्या वेदनेवर औषधाबराेबरच चित्रकलेची मात्रा दिली जात आहे.
रुग्णालयाचे वातावरण प्रफुल्लित करणारं -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे जे रुक्ष वातावरण आहे ते प्रफुल्लित करण्याचं पाऊल अधिष्ठाता डाॅ. जयप्रकाश रामानंद यांनी उचलले आहे. आठ महिन्यांपासून काेराेनामुळे काेविड वाॅर्ड बनलेल्या शासकीय रुग्णालयातील भंगार काढून अडगळ दूर करण्यात आली. इमारतींची रंगरंगाेटी करण्यात आली. दुसरे प्रवेशद्वार ते व्हायराॅलाॅजी लॅबपर्यंत नव्याने डांबरीकरण करण्यात आले. रस्त्याच्या दाेन्ही बाजूला पेव्हर ब्लाॅक लावले. आवारातील इमारतींच्या भिंती, झाडांच्या बुंध्यांवर रंगसंगतीचा अभ्यास करून ज्ञानदेव विश्वसंस्कृती गुरुपीठ मल्टिपर्पज साेसायटीचे 10 कलावंत निसर्गरम्य देखावे, वारली चित्रे रेखाटत आहेत.
चिमणीची सजावट करणार -
दर्शनी भागातील इमारतींच्या भिंतींवर चित्र रंगवली जात असल्याने महाविद्यालयाचा चेहरामाेहराच बदलेल. त्यासाेबत परिसरातील विविध वृक्षांचे बुंधे, वाॅर्ड, जुन्या इमारती आदींचा समावेश त्यात आहे. त्यासाठी 60 लिटर डिस्टेम्पर, 96 बाॅटल स्नेनर लागेल. तसेच सिव्हिलच्या जुन्या भंगारात सापडलेली जुनी चिमणीही सजवण्यात येणार आहे.