जळगाव - विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पाचोरा-भडगाव मतदारसंघात आजी व माजी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे यावेळी शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्यातच प्रमुख लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात अमोल शिंदे हे देखील भाजपकडून इच्छुक आहेत. भाजप आणि सेनेत युती झाली नाही तर शिंदे यांच्या उमेदवारीमुळे यावेळी भाजप-सेना-राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होईल.
पाचोरा मतदारसंघाचा राजकीय इतिहास
पाचोरा-भडगाव मतदारसंघात के. एम. पाटील व ओंकार वाघ यांनी ४५ वर्षे राजकारण केले. सन १९९९ मध्ये प्रथमच शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवून आर. ओ. पाटील यांनी ओंकार वाघ यांचा पराभव केला होता. २००९ च्या निवडणुकीत आर. ओ. पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वाघ आमदार झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये आर.ओ. पाटील यांचे पुतणे किशोर पाटील यांनी युवा नेतृत्त्व म्हणून मतदारसंघात वर्चस्व प्रस्थापित करीत दिलीप वाघ यांचा २८ हजार मतांनी पराभव केला होता.
या मतदारसंघात गेल्या चार वर्षांपासून शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विळ्या-भोपळ्याचे नाते निर्माण झाले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत राज्यात युती झाल्याने शिवसेनेने युती धर्म पाळत लोकसभेचे भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांना विजयी करण्यात मोलाचा वाटा उचलला. यावेळी आमदार किशोर पाटील यांचा दांडगा जनसंपर्क, पाच वर्षात केलेली विकासकामे, माजी आमदार कै. आर. ओ. पाटील यांच्याप्रती जनतेची असलेली सहानुभूती, तर दुसरीकडे दिलीप वाघ यांनी विरोधी पक्ष म्हणून जनतेचे सोडविलेले प्रश्न, कै. ओंकार वाघ यांना मानणारा मोठा वर्ग अशा परिस्थितीत विधानसभेची लढाई रंगणार आहे.
हेही वाचा... जन आशीर्वाद यात्रेतून आदित्य ठाकरेंच्या पदरात नेमकं काय ?
मतदारसंघातील संभाव्य उमेदवार
विधानसभा निवडणुकीसाठी पाचोऱ्यातून शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटील, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी आमदार दिलीप वाघ आणि भाजपकडून अमोल शिंदे, जिल्हा अध्यक्ष डॉ. संजीव पाटील हे इच्छुक उमेदवार आहेत. प्रा. अस्मिता पाटील, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, बाजार समिती सभापती सतीश शिंदे, माजी सभापती सुभाष पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डी. एम. पाटील, बी. डी. पाटील, अमोल पाटील देखील इच्छुक आहेत.
मतदारसंघात प्रभावशील जातीय समीकरणे
या मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. त्याचप्रमाणे मुस्लीम, राजपूत, माळी, गुर्जर, बौद्ध यासह इतर समाज देखील बहुसंख्येने आहेत. आतापर्यंत या मतदारसंघात मराठा समाजाचे आमदार निवडून येत होते. मात्र, १९९९ व २००४ मध्ये आर. ओ. पाटील तर त्यांच्यानंतर २०१४ मध्ये किशोर पाटील हे राजपूत समाजाचे आमदार निवडून आले आहेत. किशोर पाटील हे आर. ओ. पाटील यांचे पुतणे आहेत.